🌟नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक सुरु : एकूण साठा १२ टक्के🌟
परभणी (दि.०३ ऑगस्ट २०२४) : मराठवाड्यातील जायकवाडी या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या पाणी साठ्यात नाशिक जिल्ह्यात काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने व वरच्या भागातील प्रकल्प पाण्याने तुडूंब भरल्याने शनिवारी दि.०३ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत पाच टक्के एवढी वाढ झाली आहे.
जायकवाडीच्या जलसाठ्यावरच छत्रपती संभाजीनगरासह जालना व परभणी या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. तसेच या तीन जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यातील खरिप, रब्बी व उन्हाळी या हंगामातील सिंचनही पूर्णतः अवलंबून आहे. यावर्षी या जलाशयात ०७ टक्केच पाणी साठा शिल्लक होता. मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होईल, असे अपेक्षित होते. परंतु, जूलै ओलांडल्यानंतरसुध्दा या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. मात्र, गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने व जायकवाडीच्या वरच्या भागातील प्रकल्प पाण्याने ओसंडून वाहू लागल्यानंतर जायकवाडीच्या जलाशयात पाण्याची आवक सुरु झाली. शनिवारी सकाळपर्यंत या जलाशयातील पाणी साठ्यात ०५ टक्क्यांनी वाढ झाली. शनिवारी सायंकाळी जलाशयात १२ टक्के एवढा एकूण पाणीसाठा उपलब्ध झाला, अशी माहिती पाटबंधारे प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.....
0 टिप्पण्या