🌟परभणीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार समारंभात मा.मंत्री आ.संजय कुटे यांचे प्रतिपादन🌟
परभणी (दि.14 ऑगस्ट 2024) :- आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार अतिशय महत्त्वाचे असून ते पिढ्यानपिढ्यांपर्यंत पुढे गेले पाहिजे. संस्काराचा वारसा घेऊन राजकीय जीवनात कार्य करत असताना समाजकारणाची कास सोडू नये. समाजकारण हाच राजकारणाचा पाया असला पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार संजय कुटे यांनी येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन मंगळवारी (दि.१३) सायंकाळी परभणी शहरातील श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमास माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात 'कलोपासक, संस्कृतीरक्षक धर्माभिमानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी' या विषयावर जालना येथील उपप्राचार्य प्रा. डॉ. सोमीनाथ सारंगधर खाडे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. रामेश्वर नाईक हे होते. याप्रसंगी गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक रामकिशन रौंदळे यांच्यासह अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार विजेत्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आई वडिलांविषयी कायम कृतज्ञता बाळगून श्री. रौंदळे यांनी सुरू केलेल्या व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण या कार्यक्रमाचे श्री. कुटे यांनी कौतुक केले. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी मानून समाजाच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे. समाजातल्या उपेक्षित घटकांविषयीची तळमळ आपल्या कार्यातून दिसली पाहिजे. श्री. रौंदळे यांनी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विविध पातळ्यांवर सामाजिक कार्य केल्याचा उल्लेख यावेळी श्री. कुटे यांनी केला.
डॉ.नाईक यांनी संघर्ष हा प्रगतीसाठी नसतो तर तो आपल्या अस्तित्वासाठी असतो असे सांगत अहिल्यादेवींनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी देशभरातील शिव मंदिरांचा केलेला जिर्णोद्धार हा खर्या अर्थाने एका संस्कृतीचा जिर्णोद्धार होता, असे ते म्हणाले. अहिल्यादेवी ह्या भारतियांसाठी प्रेरणास्थान तर आहेतच, त्या आपल्या श्रध्दास्थान आहेत. असे श्री. नाईक म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आरटीओ स्वामी, सौ.मोतीपवळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात रामकिशन रौंदळे यांनी आपल्या गावात धनगर टाकळी येथे १९७५ साली सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी एका नामांकित शाळेने केवळ खेड्यातील मुलगा असल्यामुळे प्रवेश नाकारला होता. तेव्हाच निश्चय केला की आपल्याला करावा लागलेला संघर्ष भविष्यात ग्रामीण विद्यार्थ्यांना करावा लागू नये म्हणून १९८५ साली पहिली शाळा काढल्याचे सांगितले. सर्व शाळा ग्रामीण भागात सुरू करून आता सर्व प्रकारच्या शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या असून शेतकरी आत्महत्याग्रस्त, अनाथ मुलांसाठी बालगृह व मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. श्री.रौंदळे यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे सोनाजी ढगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरूवातीला रौंदळे परिवारातील रामकिसन, अर्जुन, सुभाष रौंदळे, पार्वतीबाई अडकिणे, गोपाबाई रेणगडे, चंद्रकला डुकरे, अनुसया शेळके, सुनिता हारके या सदस्यांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आ.कुटे यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन बलभीम माथेले यांनी केले. डॉ.नाईक यांचा परिचय विनोद डावरे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन पूनम काजे तर आभार प्रदर्शन श्री.बबन सवराते यांनी केले.
---------------------------------------------------------
🌟पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणजे त्यागमय जीवनाचा आदर्श - प्रा.डॉ. सोमीनाथ खाडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे अतिशय सचोटीने व प्रामाणिकपणे राज्यकारभार करून त्यागमय जीवनाचा आदर्श निर्माण केलेला आहे. दूरदृष्टीने त्यांनी प्रत्येक क्षेत्रासाठी केलेले कार्य देशासाठी आजही आदर्शवत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. सोमीनाथ खाडे (जालना) यांनी यावेळी आयोजित व्याख्यानात केले.आपण जे निर्माण करतो त्याचे रक्षण केले पाहिजे या विचाराने अहिल्यादेवी यांनी ३०० पेक्षा अधिक तिर्थक्षेत्रांचा स्वखर्चातून जिर्णोद्धार केला. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांनी न डगमगता अतिशय खंबीरपणे व तटस्थपणे राज्याचा कारभार पाहिला. आपले दुःख बाजूला सारत संघटनात्मक कामातून समाजाला उभे करण्याचे काम केले, असेही डॉ.खाडे यांनी सांगितले......
0 टिप्पण्या