🌟देवठाणा येथील संतोष पोते यांच्या ऊस शेतात भेट देऊन पोक्का बोइंग रोगाचे केले निदान🌟
परभणी :- परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ.भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील डॉ.जी. डी.गडदे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक, डॉ.ए.टी.दौंडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ.आर.एस.खंदारे, मृदाशास्त्रज्ञ व श्री.एम.बी मांडगे वरिष्ठ संशोधन सहायक या शास्त्रज्ञांच्या चमुने दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी मौजे देवठाणा ता.जि.परभणी येथील संतोष पोते यांच्या ऊस शेतात भेट देऊन पिकावर आलेल्या रोगाचे निदान केले. यावेळी उपस्थित शास्त्रज्ञांनी ऊस पिकावर पोक्का बोइंग रोग आल्याचे निदान केले. तसेच बऱ्याच ठिकाणी ऊस पिकाची कोवळी पाने पांढरट पिवळसर पडत असल्याचे सुद्धा आढळून आले. ही लक्षणे झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची असल्याचे उपस्थित शास्त्रज्ञांनी सांगितले. पोक्का बोईंग रोग हा प्राथमिक अवस्थेत असल्याने व झिंक अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांनी खालील प्रमाणे उपाय योजना सुचविल्या.
पोक्का बोइंग हा रोग 'फ्यूजॅरीयम मोनिलीफॉरमी' या बुरशीमुळे होतो. मागील काही दिवसापासून सततच्या पावसामुळे ऊस पिकात पाणी साचून राहिल्याने आर्द्रता वाढून तापमान कमी झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. याकरिता ऊस पिकात साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा. उपचारात्मक उपाय म्हणून लगेचच कार्बेन्डाझिम १२%+ मॅन्कोझेब ६३% डब्लूपी २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्लूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी सोबत उच्च दर्जाचे स्टिकर मिसळून १० ते १२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. तसेच झिंक या सुक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्या व्यतिरिक्त इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ या द्रवरूप खताची ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
याप्रसंगी देवठाणा गावातील श्री.सूर्यकांत पोते, श्री.रामराव खटिंग, श्री.रामभाऊ काशिनाथ खटिंग व श्री बापूराव खटिंग इत्यादी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आभार मानले.....
0 टिप्पण्या