🌟जागतिक युवा दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो🌟
युवा हे समाजाचे शक्तिस्थान आहेत आणि त्यांच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जागतिक युवा दिन हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व ओळखून त्याचे योग्य प्रकारे पालन करणे आवश्यक आहे. श्रीकृष्णदास निरंकारी उर्फ बापू यांचा सदर मार्गदर्शक लेख अभ्यासुया... संपादक.
जागतिक युवा दिन दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस तरुणांच्या भूमिका, त्यांचे महत्त्व, आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो. युवा हे समाजाचा भविष्य आहेत आणि त्यांच्यातील सामर्थ्य, जोश, आणि कल्पकता हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. जागतिक युवा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात कार्यशाळा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि युवा नेतृत्व विकास कार्यक्रमांचा समावेश असतो. या उपक्रमांद्वारे तरुणांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या, आणि समाजातील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून दिली जाते. या दिनानिमित्त तरुणांच्या समस्यांवर चर्चा केली जाते. शिक्षण, रोजगार, मानसिक आरोग्य, आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच, तरुणांच्या आवाजाला महत्त्व देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले जातात.
भारतात दरवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाला समर्पित आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म दि.१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची सुरुवात सन १९८५मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्यांच्या विचार आणि आदर्शांसाठी प्रसिद्ध होते. लहान वयातच त्यांनी आपल्या कल्पनांनी जगभरात स्वतःची वेगळी प्रतिमा आणि ओळख निर्माण केली होती. त्यांनी नेहमीच तरुणांना त्यांच्या विचारांनी प्रेरित केले, म्हणूनच त्यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सन १९८४साली संयुक्त राष्ट्र संघाने ते वर्ष आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर भारत सरकारने यावर विचार केला आणि तेव्हापासूनच दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंती १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. सन १९८५मध्ये देशात प्रथमच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
महत्त्व आणि उद्देश्य- कोणत्याही देशाचा उत्तम विकास त्या देशातील तरुणांवर अवलंबून असतो. भारत हा तरुण लोकसंख्या असलेला देश आहे आणि देशाची प्रगती तरुणांवर अवलंबून आहे. त्यामुळे देशातील तरुणांना योग्य मार्गदर्शनासाठी हा दिवस साजरा केला जातो. विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की, युवकांनी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. देशात राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये थीमसह स्पर्धा आयोजित केल्या जातात. याशिवाय मुले भाषणातून स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार सांगतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी "शांती स्थापनेत युवकांचा सहभाग- युथ बिल्डींग पीस" हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९८५मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९९५मध्ये जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी "वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ" स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्राध्यान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत. लिस्बन येथे ८ ते १२ ऑगस्ट १९९८ दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर १७ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.
सुरक्षा परिषदेने आपल्या २०१५ आणि २०१६च्या ठरावात शांतीस्थापनेच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी युवकांची भूमीका महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सामाजिक न्याय आणि शांतीस्थापनेच्या अशाच प्रयत्नांना यवर्षीच्या युवा दिनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
!! आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या समस्त युवक मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!
- संकलन व शब्दांकन -
तुमचा हीतैषी मित्र : श्रीकृष्णदास निरंकारी उर्फ बापू.
प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.
मु.एकता चौक, रामनगर, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883..
0 टिप्पण्या