🌟बहिष्कृतांचा आक्रोश जगाचा पटलावर मांडणारा साहित्यसूर्य, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे....!


🌟साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी ही मार्क्सवाद व आंबेडकरवाद या दोन्ही विचारांचे मिश्रण होऊन तयार होते🌟

जगविख्यात साहित्यिक,साहित्यसम्राट,डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती त्यानिमित्त त्यांच्या विद्रोही, क्रांतिकारी विचारांना त्रिवार वंदन! व सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

आज पर्यंत अनेक साहित्यिक, साहित्य समीक्षक, विचारवंत यांनी साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीची आपापल्या परीने चिकित्सा केलेली आहे. कुणी त्यांना मार्क्सवादी तर कुणी त्यांना आंबेडकरवादी विचारांचे मानले. पण मला वाटते साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी ही मार्क्सवाद व आंबेडकरवाद या दोन्ही विचारांचे मिश्रण होऊन तयार होते. ती विचारसरणी म्हणजे साठेवाद! 

आता आपण म्हणाल की,हा कोणता नवीन विचार आपण सांगत आहात. साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे एकंदरीत साहित्य व विचार यांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की,त्यांच्या साहित्यातील नायक, नायिका यांच्यावर जेव्हा वर्ग द्वेषातून अन्याय होतो तेव्हा त्यांची लेखणी ही मार्क्सवाद नावाचं अस्त्र उगारते. आणि जेव्हा वर्ण द्वेष, अंधश्रद्धा यातून अन्याय केला जातो तेव्हा त्यांची लेखणी आंबेडकरवाद नावाचे अस्त्र उगारते. हाच त्यांचा खरा विचार आहे ज्याला आपण साठेवाद म्हणलं पाहिजे.तसेच बरेच वक्ते, विचारवंत यांनी क्रांती गाणे, पोवाडे लिहिणारे अण्णाभाऊ साठे, शाहिरी, कविता, करणारे अण्णाभाऊ साठे इथ पर्यंतच त्यांच्यावर बोलतात. पण एक जागतिक दर्जाचा प्रतिभावान लेखक, शुन्यातून विश्व निर्माण करणारा महानायक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सिंहाचा वाटा असणारे एक महान व्यक्तीमत्व असे अनेक पैलू यावर बोलायला त्यांची जीभ झडतं असावी कदाचित!

     अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात मानवाला केंद्र स्थानी मानून त्यांची जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती,त्यांच्या उरात भरगच्च भरलेला स्वाभिमान, समाजात वावरत असलेली कलुषीत मनाची माणसं, त्यांची गावपातळीवर अन् शहरात होणारी कट-कारस्थान, हे अगदी जशास तसे लिहिले आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात,"मी जे पाहिलं जे जगलं तेच मी लिहिलं.लिखाणात प्रतिभा असावी.पण प्रतिभेला  वास्तवतेची जोड नसेल तर ती प्रतिभा, ते लिखाण हे अंधारात असलेल्या आरशा सारखे असते.असे ते ठामपणे सांगतात वारणेचा दरा-खोरा, सह्याद्रीच्या कडे-कपारा, तिथली माणसं अण्णा भाऊ साठे यांनी अपल्या प्रतिभेच्या जोरावर जागतिक स्तरावर उभी केली. (फकिरा, सत्तू भोसले, मास्तर, सावळा, निळू मांग) अण्णाभाऊ साठे यांची विचारसरणी ही जागतिक स्तरावर होती. त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला होता. व तो पोवाडा रशियात प्रचंड गाजला होता.म्हणजे अण्णाभाऊ साठे हे वयाच्या १७ व्या वर्षीच पोवड्याच्या माध्यमातुन रशियात पोहचले होते तसेच त्यांनी अनेक देश विदेश पातळीवर असलेल्या तत्कालीन समस्यांवर अनेक पोवाडे व क्रांती गीते लिहिली. ज्यात हिटलरच्या हुकूमशाही विरोधातील बर्लिनचा पोवाडा, नानकिंगचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब दिल्लीचा दंगा,अमळनेरचे अमर हुतात्मे, मुंबईची लावणी, अशा अनेक पोवाडे व क्रांती गीत त्यांनी लिहून तत्कालीन जुलमी व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी तीनशे हुन अधिक कथा लिहिल्या आहेत. त्या कथेत आक्रोश दिसून येतो. व्यवस्थेविरुद्ध असलेली चीडच जणू साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची लेखणी ओकते.प्रसिद्ध लेखक प्र. के. आत्रे यांनी त्यांच्या कथेचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे. आत्रे म्हणतात,"अण्णाभाऊ साठेंच्या कथा म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या कथा होय."अण्णाभाऊ साठे हे आपल्या लिखाणात केवळ आक्रोश, अकांत व्यक्त करून थांबत नाहीत. तर त्यातून मुक्तीचा मार्ग सुद्धा सांगतात अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी म्हणतात की, दारिद्रय हे फार क्रुर अन् नग्न असतं त्याच्या खुणा ह्या माणसाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतात. त्याचा प्रत्यय त्यांच्या सुलतान, भोमक्या, स्मशानातील सोनं, प्रायश्चित, चित्रा, माकडीचा माळ, अशा अनेक कथा कादंबरीत येतो.अण्णाभाऊ साठे यांनी लिहिताना जे विषय हाताळले ते अत्यंत प्रामाणिकपणे हाताळले आहेत. त्यांचं लिखाण हे वास्तववादी होत. कुठेही काल्पनिक किंवा अतिशयोक्तीला त्यांनी स्थान दिले नाही.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे आघाडीचे महान नेते होते. त्यांनी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ' लाल बावटा' कला पथकाची स्थापना केली होती. व त्या माध्यमातुन त्यांनी तत्कालीन देसाई सरकार विरोधात रान पेटवले होते. तसेच भारतीय स्वातंत्र लढ्यातही अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता.देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ते लढले.पण मुठभर लोकांच्या हाती गेलेलं स्वातंत्र्य पाहुन अण्णा भाऊ साठे यांनी त्याचा निषेध म्हणुन १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एक प्रचंड मोर्चा काढला होता. मुसळधार पावसात काढलेला हा मोर्चा होता. इतिहासात या मोर्चाला २० हजार लोकसंख्या होती अशी नोंद आहे. याचं ऐतिहासिक मोर्चात अण्णाभाऊ साठे यांनी "यह आझादी झुटी है, इस देश की जनता भुकी है|" या वाक्यामध्ये खुप मोठा अर्थ आहे. भूकी म्हणजे केवळ अन्नावाचून नाही. तर इथली  शिक्षण, आरोग्य, सत्ता, संपत्ती, यापासून कोसो दूर असलेली जनता हा आहे.

तसेच मुंबई येथे भरलेल्या पहिल्या दलीत साहित्य परिषदेत उद्घाटनपर भाषणात अण्णाभाऊ साठे हे अंधश्रद्धेवर घणाघात करतात.व जगातील एकूण उच्च दर्गा विज्ञानवादी विचार मांडतात ते म्हणतात,"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उतरली नसून, ती कष्टकरी , शेतमजूर यांच्या तळहातावर तरलेली आहे."

आपली ऊभी हयात उपेक्षित, बहिष्कृत,वंचीत समाजासाठी व्यतीत करणारे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना जयंती निमित्त पुनश्च विनम्र अभिवादन.

🙏🏻💐💐🙏🏻

     - दिपक पूर्णेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या