🌟उठा संघटीत व्हा अन् पुनश्‍च कामास लागा : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन.....!


🌟भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले🌟 


परभणी (दि.10 ऑगस्ट 2024) : लोकसभा निवडणूकीत अपेक्षेएवढे यश मिळाले नाही, म्हणजे आपला पराभव झाला असे नाही, केंद्रात स्पष्ट बहुमताद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसर्‍यांदा आरुढ झाले आहे. हे ओळखून नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने, जल्लोषाने कामास लागावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

             येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी (दि.09) ‘आता लक्ष विधानसभा’ या पार्श्‍वभूमीवर जिल्हा विस्तारित कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर,  जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे, विद्यमान महानगराध्यक्ष राजेश देशमुख, विठ्ठलराव रबदडे, भागवतराव बाजगीर, विलास बाबर, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, मधुकर गव्हाणे, सुभाष आंबट, सुरेश भुमरे, भिमराव वायवळ,  अनुप शिरडकर, सौ. मंगल मुदगलकर, डॉ. विद्या चौधरी आदी पदाधिकार्‍यांसह नेते उपस्थित होते.

           भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी 1980 पासून प्रत्येक लोकसभा निवडणूकीतून इनामे इतबारे काम करीत संख्याबळ वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यासाठी समोर मोठे ध्येय ठेवले. विशेषतः ‘अब की बारी अटल बिहारी’ असा वारंवार नारा दिला. 275 संख्याबळाचे लक्ष समोर ठेवले. दुर्देवाने केवळ दोनच सदस्य यश पटकावू शकले. परंतु नेतृत्वासह सामान्य कार्यकर्त्यांनी जिद्द सोडली नाही. मेहनतीद्वारे संघटना उभी केली. त्याद्वारे पुढे मोठा पल्ला गाठण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्ट करतेवेळी दानवे यांनी आता तर खाली-वर सरकार तुमचे आहे, पार्टी तुमची आहे, त्यामुळे स्थानिक नेतृत्वासह सामान्य कार्यकर्त्यांनी स्वतः विकसित व्हावे, स्वतःसह पार्टी भोवती माणसं उभी करावीत, भक्कम संघटनात्मक बांधणीच्या जोरावर यश पटकवावे, असे आवाहन केले.

             या लोकसभा निवडणूकीत अपेक्षेएवढे यश मिळाले नाही. त्याचा अर्थ आपला पराभव झाला, असे नाही. केंद्रात स्पष्ट बहुमताने एनडीएचे सरकार सत्तारुढ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले आहेत, याचे भान प्रत्येकाने राखावे. पराभवाची मानसिकता न बाळगता विरोधकांच्या अपप्रचारास तेवढ्याच ताकदीने उत्तर देवून नव्या जोमाने, नव्या उमेदीने उभे रहावे. आता विधानसभा निवडणूका होवू घातल्या आहेत, त्या निवडणूका हेच आपले लक्ष असले पाहिजे. त्या दृष्टीने सामान्य कार्यकर्त्यापासून ते स्थानिक नेतृत्वाने एकीच्या बळावर निवडणूकीस सामोरे गेले पाहिजे. आपआपसात असमन्वय, समज-गैरसमज, एकमेकांचे उणेधुणे, उखाळ्या-पाखाळ्या, गार्‍हाणे वगैेर करण्याऐवजी प्रत्येकाने आपण स्वतः व पार्टीच्या पाठीशी कितपत माणसे उभे करू, योगदान देवू, या दृष्टीनेच विचार केला पाहिजे, असे स्पष्ट करतेवेळी दानवे यांनी यश, अपयश हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे नकारात्मक मानसिकता बाजूला फेकून नव्या उमेदीने, निष्ठेने आपण सगळे कामाला लागूया, असे आवाहन केले. उठा, संघटीत व्हा, पुनश्‍च कामाला लागा. या निवडणूकीतून विरोधकांना पुन्हा एकदा मोठा धडा शिकवा, असेही आवाहन दानवे यांनी केले.

             दरम्यान, यावेळी आमदार सौ. मेघना साकोरे, ज्येष्ठ नेते वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वाकोडकर, भरोसे, विलास बाबर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य कुलकर्णी यांच्यासह अन्य काही नेतेमंडळींची भाषणे झाली. यावेळी जिल्ह्यातील दिवंगत नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांना एका ठरावाद्वारे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राजेश देशपांडे यांनी त्या संबंधीचा ठराव मांडला. या मेळाव्यास संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या