🌟राज्यातील नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु....!


🌟मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन🌟

परभणी (दि.23 ऑगस्ट 2024) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने राज्यातील नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपल्या देशात सर्व धर्माचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. राज्यात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार हा देशाच्या सीमा ओलांडून झाला असून, एक पावनभूमी म्हणून राज्याची ओळख आहे. येथे वारकरी संप्रदाय, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्म-समाजकार्य भक्ती मार्गाने करत असतात. दैनंदिन कर्तव्य पार पाडताना देवदेवतांचे-भगवंताचे नामस्मरण, चिंतन करत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्माचे चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मीयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत. आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून र्तीर्थस्थळी जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ्ठ नागरिक त्यांच्या परिस्थितीमुळे वा सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्णच होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक 60 वर्षे व त्याहून अधिक वयाचे असणारांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची-दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

* मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : योजनेचे उदि्दष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रा मोफत उपलब्ध करून देणे 

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येतील. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा अंत्योदय अन्न योजना/ प्राधान्य कुटुंब योजना/वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले शिधापत्रिकाधारक पात्र ठरतील

प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्याची निवड : या योजनेंतर्गत विविध दळणवळणाच्या साधनाद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच भारतीय रेल्वे विभाग किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्याची निवड विहित नियमांचे निविदा प्रक्रियेने पालन करून करण्यात येईल. 

लाभार्थ्याची निवड : प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल, विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित पारदर्शक पद्धतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100 टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. मात्र दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरिता कमाल एक हजार पात्र लाभार्थ्यांचा कोटा निश्चित करण्यात येत असून कोट्याचा कमाल मर्यादेत तसेच प्रति लाभार्थी  तीस हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत शासनाने दिनांक 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या तीर्थक्षेत्रांमधून तीर्थदर्शन यात्रा (टूर पॅकेज) निश्चित करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीस असतील. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर (दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 नंतर) जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. जर पती-पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल, आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर जिल्हास्तरीय समिती त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र व जेष्ठ नागरिकास या योजनेसाठी दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,परभणी येथे विनामूल्य उपलब्ध असेल. 

तात्पुरत्या यादीचे प्रकाशन : ऑफलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पत्र अर्जदारांची तात्पुरती यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीर केली जाईल आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची पोर्टल-अॅपवर जाहीर केली जाईल. मूळ अर्जदारासह जीवनसाथी-सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी : 75 वर्षावरील अर्जदाराच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. सहायकाचे किमान वय 21 ते कमाल 50 वर्ष असावे. एखादा सहायक प्रवासात घेतल्यास त्यालाही सारख्याच सुविधा मिळतील. सहायकाने शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

या योजनेची नवीन वेबसाईट/पोर्टल बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या अधिनस्त महामंडळाकडून तयार करून घेण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या