🌟त्यामुळे शिवसेना आणि मनसेमधील वाद तापला असून त्याला कोणतं वळण मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे🌟
✍️ मोहन चौकेकर
ठाणे : ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोठा राडा झाला असून आक्रमक मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले. त्यामध्ये ठाकरेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचं समोर आलं आहे. तसेच मनसैनिकांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्याही फेकल्याचं समोर आलं. त्यामुळे शिवसेना आणि मनसेमधील वाद तापला असून त्याला कोणतं वळण मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ठाण्यातील रंगायतन सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण आणि बांगड्या फेकल्या. मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ देखील फेकून मारले. त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून शिवसैनिकही जखमी झाल्याची माहिती आहे.
राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बिड येथे त्यांचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या.
मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
*राज ठाकरेंचा उल्लेखही नाही :-
ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी त्यांच्या भाषणात त्याचा कुठेही उल्लेख केला नाही.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली पण राज ठाकरे आणि मनसेच्या राड्यावर एकही शब्द बोलले नाहीत.
*मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का :-
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातील मेळावा सुरू असतानाच त्यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. आनंद दिघे यांच्या काळापासून त्यांच्यासोबत असलेल्या अनिता बिरजे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतरदेखील अनिता बिरजे या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. मात्र त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरल्याने हा ठाण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या