🌟सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी परभणी,मानवत व पालम तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते🌟
परभणी :- परभणी कृषि विज्ञान केंद्रा मार्फत परभणी जिल्ह्यामधुन मिरचीची निर्यात करण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने निर्यातक्षम मिरची लागवड तंत्रज्ञान याबाबतचे प्रशिक्षण व प्रक्षेत्रभेटीच्या कार्यक्रमाचे दि. 12/08/2024 रोजी मौजे.भोगाव साबळे येथे डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये अमित तुपे,शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र,परभणी यांनी निर्यातक्षम मिरची लागवड तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. मिरची पिकासाठी आवश्यक खते, एकात्मिक किड व रोग नियंत्रण पध्दतीमध्ये जैविक, भौतिक व रासायनिक किटकनाशकांबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. निर्यातक्षम लागवड केलेल्या मालाची तोडणी करताना या मालामध्ये किटकनाशकांचा अंश कशाप्रकारे येणार नाही व त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, तसेच निर्यातीबाबतच्या तांत्रिक बाबी, फायटोसॅनीटरी प्रमाणपत्र याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
या निर्यातक्षम लागवडीच्या प्रकल्पामधुन शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठेची ओळख व्हावी व जागतिक दर्जाची कृषि उत्पादने कशी तयार करता येतील व त्याबाबत शेतकरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हेच या प्रकल्पाचे उदिष्ट असल्याचे त्यांनी नमुद केले या प्रकल्पातुन उत्पादन करण्यात येणाऱ्या मिरचीची खरेदी बाजारभावापेक्षा जास्त दराने सानुप्रिया शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत करण्यात येणार असुन त्यांचे मार्फतच मिरचीची निर्यात करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्रि. ज्ञानेश्वर पवार, कंपनी प्रतिनीधी यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे आवाहन केले. तसेच उत्पादित केलेली सर्व मिरची खरेदी करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी परभणी, मानवत व पालम तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. कुंडलिक खुपसे व आभार प्रदर्शन श्री.नामदेव काळे यांनी केले. सदरील कार्यक्रमानंतर मौजे. उक्कलगाव, रुढी, नागरजवळा, ता. मानवत व चाटे पिंपळगाव ता. पाथरी येथील निर्यातक्षम मिरची लागवड प्रक्षेत्रास सर्व तज्ञांनी भेटी दिल्या....
0 टिप्पण्या