🌟असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे🌟
परभणी (दि.12 ऑगस्ट 2024) : खरीप हंगाम 2023 मधील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी 5 हजार अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य राज्यशासन कृषि विभागामार्फत देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तीक शेतकरी यांनी संमती पत्र व आधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आपल्या गावच्या कृषि सहायक यांचेकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलव्दारे कापुस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील. ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करुन अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजना फक्त सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत राहील.
खरीप हंगाम 2023 कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. 1 हजार तर 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.सामायीक खातेदारांनी सामायीक खातेदार नाहरकत प्रमाणपत्र तसेच संमती पत्र आधार कार्डची प्रत व मोबाईल क्रमांक आपल्या गावच्या कृषि सहायक यांचेकडे जमा करावी. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......
0 टिप्पण्या