🌟परभणी जिल्ह्यातील दूध संकलन दैनंदिन 1 लक्ष लिटरवर नेणार : आमदार डॉ.राहुल पाटील


🌟पुढे बोलतांना आ.डॉ.पाटील म्हणाले, परभणी जिल्ह्यात चारा,पाणी मुबलक प्रमाणात : परंतु पाहीजे त्या प्रमाणात दुग्धव्यवसाय नाही🌟

परभणी (दि.07 ऑगस्ट 2024) :- परभणी जिल्ह्यातील दूध संकलन प्रतिदिन 1 लक्ष लिटर करण्यात येणार आहे, त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून या माध्यमातून शेतकर्‍यांना जोडधंदा उभा करुन देत आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

              साबर डेअरी अंतर्गत किसान कृपा दूध शीतकरण केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि.07 ऑगस्ट रोजी परभणी मेडीकल कॉलेज अ‍ॅन्ड आर.पी. हॉस्पिटल परिसरात दूध उत्पादक शेतकर्‍यांचा महामेळावा पार पडला. यावेळी आमदार डॉ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस.व्ही. गिणगिणे, पशूसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. पी.पी. नेमाडे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेवराव आघाव, डेअरी विभागाचे दुध संकलन पर्यवेक्षक उमेश गुंडूरे, उपविभागीय कृषि अधिकारी रवि हरणे व एल.डी. एम. लीड बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी, पशू विमा प्रतिनिधी अभय जोशी, अमूल पशू खाद्यचे व्यवस्थापक अमित भोसले, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक दिवाकर राव व एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक निलेश भावसार आदींचीही यावेळी उपस्थिती होती.

              पुढे बोलतांना आमदार पाटील म्हणाले, परभणी जिल्ह्यात चारा, पाणी मुबलक प्रमाणात आहे, परंतु पाहीजे त्या प्रमाणात दुग्धव्यवसाय सुरु नव्हता, परंतु आता मागील काही वर्षापासून दुग्धव्यवसायात वाढ होत असून ही निश्‍चीतच चांगली बाब आहे. जिल्ह्यात धवल क्रांतीचे आपले स्वप्न होते, आता ते पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच जिल्ह्यातील दूध संकलन प्रतिदिन 1 लक्ष लिटर करणार आहोत, असे ते म्हणाले.

             परभणी मतदार संघात बंधारे, छोटे तलाव, शेततळे यामाध्यमातून पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे चारा, पाण्याची समस्या सुटली आहे. शेतकरी व त्यांच्या कुटूंबाने या चार्‍याचा उपयोग करुन दुग्धव्यवसाय सुरु केला आहे. सध्या मानवत येथे 25 हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. लवकरच हा आकडा एक लाखावर जाणार आहे. शेतकर्‍यांना अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करुण देण्याासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत. तसेच म्हशीचे दूध पश्‍चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे धवलक्रांती झाली आहे, त्याहून अधिक प्रमाणात परभणी जिल्ह्यात दुग्धव्यवसाय वाढला पाहीजे यासाठी आपला प्रयत्न राहणार असून गाईच्या दुधाला जसे अनुदान दिले जाते त्याचपध्दतीने म्हशीच्या दुधाला 5 रू. प्रती लिटर रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत, असे आमदार पाटील म्हणाले.

             या महामेळाव्यात यशस्वी दूग्ध व्यवसायाची पंचसूत्री, उच्च वंशावळीच्या कालवडीची पैदास व संगोपन, सेक्ससिमेनची उपलब्धता व वापर, पशूविमा, पशूधन खरेदीसाठी बँकांद्वारे सुलभ हफ्त्यात कर्ज पुरवठा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच  प्रगतशील उत्पादकांचा यावेळी यथोचित असा सन्मान करण्यात आला. या मेळाव्यासाठी किसान कृपा दूध संकलन आणि शीतकरण केंद्र (ता. मानवत) चे संचालक भूषण चांडक, झिंकल पटेल, पोपट देसाई, वैभव बारहाते, के.पी. सिंग व दुष्यंत कुमार यांनी परिश्रम घेतले.

* विद्यापीठाद्वारे योग्य ते मार्गदर्शन केले जाईल...

             परभणी सारख्या या भागात धवलक्रांतीची सुरुवात ही सुखावह बाब आहे. त्यासाठी डॉ. पाटील यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात परभणी जिल्हा हा दुधाच्या बाबतीत संपन्न होणार यात शंका नाही. येथील मुबलक, पाणी, चारा याचा वापर दुग्धव्यवसासाठी होत आहे. दुग्धव्यावसायीकांना विद्यापीठाच्यावतीने योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल, शेतकर्‍यांनी विद्यापीठात यावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या