🔹शेळके,वाघमारे,राऊत,यादव,बुधवंत यांच्या नावाची चर्चा🔹
परभणी : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणूकीत ओबीसी समाजाचा ऊमेदवार रिंगणात ऊतरवण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते हरिभाऊ शेळके, परभणीचे माजी महापौर भगवानराव वाघमारे, नानासाहेब राऊत, कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, कॉंग्रेस नेते विशाल बुधवंत यांच्या नावांची ऊमेदवार म्हणून चर्चा होत आहे. ओबीसी समाजाचा स्वतंत्र ऊमेदवार निवडणूकीत ऊतरल्यास निवडणूकीचे चित्र बदलणार असल्याने या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण अजूनही पेटलेले आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले वाटप, मराठा नेत्यांची सुरू असलेली सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी यामुळे ओबीसी समाजात असुरक्षीततेची भावना निर्माण झालेली आहे. तसेच दोन्ही गटांकडून होत असेलेली टोकाची वक्तव्ये यातूनच मराठा-ओबीसीत दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. होवू घातलेल्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही प्रमुख पक्षांच्या वतीने मराठा ऊमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्यता असल्याने आपला स्वतंत्र ऊमेदवार असावा अशी ओबीसी समाजातील सर्वसामान्यांची भावना दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच परभणीत संपन्न झाली. या बैठकीत ओबीसी समाजाचा पक्षविरहीत ऊमेदवार ऊभा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याच उमेदवारास सर्व ओबीसींनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. पुर्णा येथील जेष्ठ नेते हरिभाऊ शेळके, परभणीचे माजी महापौर भगवानराव वाघमारे, कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, कॉंग्रेस नेते विशाल बुधवंत, माजी जि. प. सदस्य नानासाहेब राऊत, प्रा. किरण सोनटक्के, बंजारा नेते गोविंदराव राठोड, प्रा. विठ्ठल तळेकर, सखाराम बोबडे पडेगावकर यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. सकल ओबीसी समाजाकडून ऊमेदवार रिंगणात ऊतरल्यास परभणी लोकसभेचे चित्र वेगळे असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने सध्या चाचपणी सुरू असून ऊमेदवाराबाबत एकमत आणि समाजाचा पाठींबा या बाबींवर पुढची दिशा ठरवण्याचा निर्णय परभणीतील बैठकीत घेण्यात आला आहे......
0 टिप्पण्या