🌟इतिहासाचार्य वि.का.राजवाडे पुण्यतिथी विशेष : अस्सल कागदपत्र आधार तोच खरा इतिहासकार....!


🌟राजवाडे म्हणायचे-ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील🌟

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्य इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचे साधन मानले जाते. सविस्तर माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजींच्या लेखातून...संपादक.

 सन १८९८ साली त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. दि. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे- ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.

       वि.का.राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे दि.२४ जून १८६३ रोजी झाला. बीएपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते. राजवाडे यांच्या मृत्यूनंतर द.वा.पोतदार यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु.८ शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते. यानुसार इ.स.१२ जुलै १८६४ हा दिनांक मिळतो. मात्र त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या राजवाडे तिलांजली अंकात वा.दा.मुंडले यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे, त्यानुसार राजवाडे यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले यांनी पोतदारांकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंतांकडे विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंतांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडलेंच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु.८ शके १७८५ अशी नोंदवलेली आहे. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे. दत्तोपंत पोतदार यांनीही नंतरच्या काळात याच तिथीचा उल्लेख केलेला आढळतो. याव्यतिरिक्त दि.१२ जुलै १८६३ आणि दि.२४ जुलै १८६३ असे दोन दिनांक राजवाडे त्यांच्या जन्मतारखा म्हणून नोंदवलेल्या आढळतात. मात्र त्यांचे आधार नोंदवलेले आढळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध पुरावे पाहता आषाढ शु.८ शके १७८५ अर्थात दि.२४ जून १८६३ हाच त्यांचा खरा जन्मदिनांक असावा, असे म्हणता येते.

     राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. महिकावतीची बखर आणि राधामाधव विलास चंपू या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले. मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. ते संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही त्यांनी अविश्रांत कष्ट घेऊन ऋणी केले. प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. त्यांनी लिहिलेली राधामाधव विलास चंपू या प्राचीन ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. ते आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. त्यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी.ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहास संशोधक त्र्यं.शं.शेजवलकर यांनी राजवाडेंच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी त्यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात होता. विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे त्यांचे स्थान अबाधित राहिले.

      इतिहासकार राजवाडे हे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळे साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. अंतिम चित्रण, इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले. त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. अशा या थोर इतिहासाचार्यांचे दि.३१ डिसेंबर १९२६ रोजी निधन झाले.

!! त्यांच्या अचाट अविस्मरणीय स्मृतींना विनम्र अभिवादन !!

श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.

                          द्वारा- श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ,

                          मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.

                          ता. जि. गडचिरोली, मो. ९४२३७१४८८३.

                         इमेल- krishnadas.nirankari@gmail.com


                          

                           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या