🌟'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा' अभियानात सहभागी व्हावे - शिक्षणाधिकारी गणेश शिंदे


🌟यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या शाळांना लाखो रुपयांच्या पारितोषिकाने गौरविण्यात येणार🌟

परभणी (दि.28 डिसेंबर) : जिल्ह्यातील सर्व शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्राला चालना मिळावी, यासह स्पर्धात्मक पद्धतीने बदल व्हावा, या उद्देशाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आपली शाळा कशी सुंदर करता येईल, या पद्धतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' या उपक्रमात शाळेसह परिसरात विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उभारण्यास मदत होईल. यात जिल्हा परिषद, खासगी शाळा, शहर स्तरावर अशा तीन गटात स्पर्धा आहे. सामाजिक हेतूने यात सर्वांनी सहभागी होऊन निकोप स्पर्धा करण्याचे असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे. 

यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या शाळांना लाखो रुपयांच्या पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीचा अवलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात. यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेसह सर्वच व्यवस्थापनांच्या शाळेत आवश्यक तो बदल व्हावा, या उद्देशाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी शाळा परिसरात सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून, यातून उत्कृष्ट शाळांची निवड सुद्धा करण्यात येणार आहे.

शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, या सकारात्मक हेतूने या अभियानाची नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या माध्यमातून त्या- त्या भागातील शाळेत आवश्यक त्या सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या माध्यमातून उभारलेल्या सुविधांच्या पाहणीसाठी तालुकास्तरीय मूल्यांकन समिती अध्यक्षपदी गटविकास अधिकारी, तर सदस्य सचिव शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे समिती सदस्यांचा समावेश आहे.

या अभियानात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शाळांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने तालुका पातळीवर अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळणाऱ्या शाळेस तीन, दोन आणि एक लाखाचे, तर जिल्हास्तरावर अकरा, पाच आणि तीन लाखाचे बक्षीस आहे. यासह विभागस्तरावर 21,19 आणि 7 लाख, तर राज्यस्तरावर तब्बल 51 लाख, 21 लाख आणि तिसरे बक्षीस 11 लाखाचे आहे.

अभियानांतर्गत संबंधित शाळांना आपल्या पातळीवर विद्यार्थी केंद्रित सुविधांच्या अनुषंगाने राबवलेल्या उपक्रमास 60 गुण निश्चित करण्यात आले आहेत. यासह उर्वरित 40 गुण शाळेसह व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रमात आरोग्य, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, भौतिक सुविधा आदींचा यात समावेश आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या