🌟गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे उद्या मोफत बघा नाटक "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा...!


🌟महाराष्ट्र शासन मुंबईच्या वतीने सदर नाटकाचे मोफत आयोजन🌟

गडचिरोली (दि.०२ नोव्हेंबर) - झाडीपट्टी व नागरी रंगभूमीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेले चुडाराम बल्हारपूरे लिखीत व अनिरुद्ध वनकर दिग्दर्शीत "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या तीन अंकी नाटकाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे कळते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत या नाटकाचा प्रयोग मौजा कुरखेडा, जिल्हा गडचिरोली येथे उद्या शुक्रवारी ३ तारखेला "लोकजागृती संस्था, चंद्रपूर" तर्फे सादर होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे हस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री- वने व सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री. धर्मरावबाबा आत्राम मंत्री- अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मा.अशोकजी नेते खासदार चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्र, मा.श्री.कृष्णा गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, मा.श्री.डॉ.देवराव होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र तथा पद्मश्री डॉ.परशुराम खुणे हे राहणार आहेत.     

         सर्वसामान्य जनतेसाठी हे नाटक शासनाचे वतीने विनामूल्य दाखविण्यात येणार आहे, असे मा.श्री.विकास खारगे प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग आणि मा.विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी कळविले आहे. विशेष उल्लेखनीय की, या नाट्यप्रयोगात सिने.भारत रंगारी, प्रविण भसारकर, निखिल मानकर, अभिषेक मोहूर्ले, अरविंद खंदारे, प्रमोद दुर्गे, अखिल भसारकर, रविंद्र धकाते, जुगल गणवीर, रुपाली खोब्रागडे, राणी धुळे, स्मिता धुळे, जागृती निखारे, बाल कलावंत रुचीत निनावे आदी कलावंतांसह एकूण ३५ कलावंतांचा सक्रिय सहभाग आहे. 

         गोंडवानातील आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा व बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संघर्षासाठी दिलेल्या लढ्याची कथा जनमानसांना माहिती नाही, ती सर्वांपर्यंत पोहचावी. जसे की, विर उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, तंट्या भिल्ल यांचे चरित्र सर्वांना माहीत आहे, तसेच गोंडवानातील आदिवासी क्रांतिकारकांची क्रांतीगाथा माहित व्हावी, असा या नाटकाच्या लेखनाचा व सादरीकरणाचा मूळ हेतू असल्याचे नाट्य दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर व नाटककार चुडाराम बल्हारपूरे सांगतात. या नाट्यप्रयोगाची माहिती आमच्या न्युज कार्यालयास श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या