🌟सर्व खासगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चे पालन करणे बंधनकारक🌟
परभणी : केबल टेलिव्हीजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ अंतर्गत दूरचित्रवाणी, स्थानिक वाहिन्या, खासगी एफ.एम. रेडिओ केंद्र आणि कम्युनिटी रेडिओवरून प्रसिद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणावर या समितीचे नियंत्रण राहणार असून, त्यासंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, समिती सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सदस्य जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद अहमद, कै. सौ. कमलाताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डॉ. संगीता आवचार, सामाजिक, आर्थिक विकास संस्था केरवाडीचे संदीप बेंडसुरे आदी बैठकीला उपस्थित होते.
सर्व खासगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चे पालन करणे बंधनकारक असून, कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खाजगी वाहिन्यांनी फ्रि-टू-एअर वाहिन्या आणि दूरदर्शन वाहिन्याचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे व अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्ये मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. नोंदणीकृत खाजगी वाहिन्या किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास या कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच अनिवार्य वाहिन्यांच्या प्रक्षेपणात व्यत्यय येणे, सिग्नल न मिळणे अशा त्रुटी आढळल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी संबंधित केबल ऑपरेटरला समज देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील कार्यरत खासगी एफ. एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सद्वारे हवाई प्रसारण संहितेचे पालनावर लक्ष व नियंत्रण ठेवणे, तक्रारींची शहानिशा करून केबल चालक किंवा खासगी एफ. एम. रेडिओविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल. एखाद्या कार्यक्रमाचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम अथवा समाजात असंतोष निर्माण होत असेल तर तात्काळ जिल्हाधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या त्वरित नजरेस आणून देण्याचे आदेश त्यांनी दिले.तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबंधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये सदर केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरातीबाबत एकही प्रकरण दाखल झाले नसल्याचे सांगून खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम १९९५ चा उद्देश आणि कार्यक्षेत्राची सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी माहिती दिली. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील स्थानिक वाहिन्यांबाबत जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पहिला मजला, शासकीय इमारत, परभणी येथे सादर कराव्यात. तसेच प्राप्त तक्रारी समितीसमोर ठेवण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देत जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव अरुण सूर्यवंशी यांनी आभार मानले.....
*****
0 टिप्पण्या