🌟परभणी जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार भरविणे,गुरांची वाहतुक व प्राण्यांच्या शर्यती करीता सशर्त परवानगी....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दि.17 नाव्हेंबर 2023 च्या आदेशान्वये सशर्त परवानगी दिली🌟

परभणी (दि.20 नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्यात व जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीय सर्व गोवंशीय जनावरांची ने-आण करण्यास, वैरण गवत किंवा अन्य साहित्य, बाधित प्राण्यांच्या शव, कातडी किवा अन्य कोणताही भाग या प्राण्यांचे उप्पादन नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास, प्राण्यांचे बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्राण्यांच्या प्रदर्शन आयोजित करण्यास मनाई करण्यात आली होती. परंतू जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दि. 17 नाव्हेंबर 2023 च्या आदेशान्वये सशर्त परवानगी दिली आहे.

राज्यामधील गोवंशीय पशुधनास सशर्त जिल्ह्यातंर्गत गुरांच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. त्यानुसार प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व महाराष्ट्र अधिसूचना दि. 17 जून, 2022 अनव्ये, जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारान्वये जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणताही प्राणी बाजार भरविणे तसेच जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतुक करणे व प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणेकरिता खालील अटींच्या अधीन राहुन मान्यता देण्यात येत आहे.

यामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातंर्गत वाहतुक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्मरोगाकरीता 28 दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. वाहतुक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग असणे तसेच टॅग नंबर असणे तसेच ईनाफ पोर्टवर नोंदणी असणे बंधनकारक असेल. संक्रमीत नसलेल्या क्षेत्रातुन गुरांची वाहतुक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. गुरांची वाहतुक करतांना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतुक अधिनियम 2009 मधील नियम क्रमांक 47 अन्वये स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील पशु बाजारामध्ये (कृषी उपतन्न बाजार समिती, ग्रामपंचायत/प्रक्षेत्रे) यापुढे टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरण खात्री झाल्याशिवाय खरेदी विक्री होवू देऊ नये. जिल्ह्यात प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यापूर्वी जनावरांचे लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण झाल्याची खात्री करावी.

या आदेशाची अमंलबजावणी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सूचना नुसार पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहाकरी संस्था व सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेशात दिलेल्या आहेत.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या