🌟परभणी जिल्ह्यात कुणबी मराठा - मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ....!


🌟कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले🌟

परभणी (दि.०४ नोव्हेंबर) : जिल्ह्यात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याहस्ते पालम तालुक्यातील दोघांना कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण केल्यानंतर सेलू व जिंतूर तालुक्यातील प्रत्येकी एका युवकाला कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 

सेलू तालुक्यातील सावंगी येथील नामदेव किशन ताठे व जिंतूर तालुक्यातील चांदज येथील संतोष अनंतराव फंड यांना उपविभागीय अधिकारी श्री. लाहोटी यांनी ही प्रमाणपत्रे वितरीत केली. जिल्ह्यात कुणबी मराठा प्रमाणपत्राचे अनुक्रमे तिसरे व चवथे लाभार्थी ठरले आहेत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते नुकतेच शैलेश दशरथ घोडके आणि तुकाराम भुजंगराव गरुड या दोन युवकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.  

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीने परभणी जिल्ह्यातील कुणबी मराठा समाजाच्या नोंदी तपासण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा केला होता. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय कार्यालयातील कागदपत्रांच्या नोंदी आणि नागरिकांनी सादर केलेले पुरावे तपासून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत हा प्राथमिक अहवाल स्विकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहवाल स्विकारल्यानंतर कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे सादर करणाऱ्यांना तात्काळ जात प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचे प्राधान्याने वितरण करण्याची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेऊन जिल्हास्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

 सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनाकडे पाठवलेल्या अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यातील सर्व संबंधीत विभागाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे 20 लाख 75 हजार नोंदी तपासण्यात आल्या असून, त्यापैकी सन 1883 ते सन 1910 या कालावधीतील 2 हजार 41 नोंदीचे पुरावे प्रशासनाला सापडले आहेत. यात महसुली, शैक्षणिक, भूमी अभिलेख आदी विभागाकडील कच्च्या आणि पक्क्या नोंदी, हक्कनोंद, नमुना 12, त्यासोबतच खासरा उताऱ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुळातील किंवा कुटूंबातील अनेक सदस्यांना याआधारे प्रमाणपत्र देण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.  

जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांच्या वंशावळी, वारसा नोंदी जुळल्यानंतर त्यांना कुणबी मराठा-मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे दाखले देण्यात येणार असून, जिल्ह्यात मराठा समाजातील युवकांना हे जात प्रमाणपत्र वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी संबंधीत कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे...... 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या