🌟भारतीय संघ फायनलमध्ये ; न्युझीलंडवर ७० धावांनी मिळवला विजय......!


🌟मोहम्मद शमीच्या ७ विकेट्स, विराट कोहली व श्रेयसची शतके; कुलदीपने फिरवली मॅच🌟

न्यूझीलंडचा संघ 'डेंजर' का आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली. भारताने ठेवलेल्या ३९८ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर माघारी परतूनही किवींकडून कडवी टक्कर मिळाली. केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांनी भारतीय चाहत्यांना गॅसवर ठेवले होते. २०१९च्या कटू आठवणी हळुहळू डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या... मोहम्मद शमीने दोन वेळा भारताला सामन्यात पकड मिळवून दिलेली, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला साथ मिळत नव्हती.. भारतीय खेळाडू निराश अन् चाहते हताश झालेले दिसले. अखेर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला तो मोहम्मद शमीने घेतलेल्या सहाव्या विकेटने. कुलदीप यादवच्या शेवटच्या टप्प्यातील दोन षटकाने खऱ्या अर्थाने मॅच फिरवली.

मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना ३९ धावांवर माघारी पाठवून भारताला चांगली सुरुवात करून दिली. डेवॉन कॉनवे  ( १३) आणि रचिन रवींद्र ( १३) हे स्वस्तात माघारी परतले. पण, केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांच्या १८१ धावांच्या भागीदारीमुळे वानखेडे स्टेडियमवर शांतता पसरली होती. त्यात भारतीय खेळाडूंकडून झेल सुटले, रन आऊटची संधी गमावली गेली अन् पायचीतचा निर्णय विरोधात गेला.. त्यामुळे तणाव वाढत चालले होते. मिचेल उत्तुंग फटके मारत होता, तर केनने कौशल्यपूर्ण खेळी करून चौकार मिळवले होते. मिचेलने ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणारा तो किवींचा तिसरा फलंदाज ठरला. 

 

 ही सेट जोडी तोडण्यासाठी शमीला पुन्हा गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने ३३ व्या षटकात मॅचला कलाटणी दिली. केन ७३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६९ धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ टॉम लॅथमही भोपळ्यावर पायचीत झाला. शमीची ही वर्ल्ड कपमधील पन्नासावी विकेट ठरली आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने सर्वात कमी १७ सामन्यांत हा टप्पा ओलांडून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. मिचेल स्टार्कने १९ डावांत विकेट्सचे अर्धशतक साजरे केले होते. या विकेटनंतर न्यूझीलंड पूर्णपणे बॅकफूटवर फेकले गेले आणि इथून विजय मिळवणे अशक्यच झाले. 

पायात गोळा अन् शरिरातून घामाचा धारा वाहत असतानाही मिचेल खेळपट्टीवर उभा राहिला. ६० चेंडूंत १३२ धावांची न्यूझीलंडला गरज होती. कोणत्याही संघाने धावांचा पाठलाग करताना शेवटच्या १० षटकांत एवढ्या धावा केलेल्या नव्हत्या. ग्लेन फिलिप्सही हात मोकळे करू लागला आणि सिराजच्या एका षटकात त्याने २० धावा कुटल्या. पण, कुलदीपने पुढच्या षटकात केवळ २ धावा दिल्या. ही मॅच फिरवणारी ओव्हर होती. शेवटची ८ षटकं अन् भारताच्या ३ प्रमुख गोलंदाजांवर आता सर्व भीस्त होती. जसप्रीतने ४३व्या षटकात संथ गतीच्या चेंडूवर फिलिप्सला ( ४१) बाद केले. रवींद्र जडेजाने सीमारेषेवर सुरेख झेल घेतला अन् त्याच्या पत्नीने फ्लाईंग किस्स दिला. कुलदीपच्या पुढच्या षटकात मार्क चॅम्पमन ( २) जडेजाच्या हाती झेल देऊन परतला. 

न्यूझीलंडला ३६ चेंडूंत ९९ धावा करायच्या होत्या. शमीने आजच्या सामन्यातील पाचवी विकेट घेताना मिचेलला बाद केले. मिचेलने ११९ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांसह १३४ धावा केल्या. वर्ल्ड कप मधील चौथ्यांदा शमीने डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि उपांत्य फेरीत पाच विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला. शिवाय सर्वाधिक ४ वेळा ५ विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही त्याने नावावर नोंदवला. सिराजला अखेर ४८व्या षटकात विकेट मिळाली. शमीने ५७ धावांत ७ विकेट्स घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ३२७ धावांत तंबूत पाठवला. भारताने ७० धावांनी हा सामना जिंकला. 

तत्पूर्वी,  रोहित शर्मा  (४७) आणि शुबमन गिल ( ८० ) यांनी ७१ धावांची वादळी सुरुवात करून दिल्यानंतर विराट व श्रेयस यांनी १२८ चेंडूंत १६३ धावांची भागीदारी केली. विराटने ११३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून ११७ धावा केल्या. श्रेयसने ७० चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह १०५ धावांची वादळी खेळी केली. लोकेश राहुलसह त्याने २९ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. लोकेश २० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ३९७ धावा केल्या......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या