🌟दिवाळी विशेषांक विशेष : वाचन अभिरुचीवर संस्कार झाले पाहिजेत....!



🌟दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते🌟

       दिवाळी विशेषांक हे मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी विशेषांक असे म्हणतात. मनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता. सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक हे सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीच्या दिवाळी अंकांत मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे. महाराष्ट्रात हजारोंच्या वर दिवाळी अंक प्रदर्शित होतात. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा ज्ञानवर्धक व माहितीपूर्ण लेख...संपादक.

          अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी विशेषांक काढत आहेत. त्यासोबतच आरोग्य, खेळ यांसारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात. या सोबतच ऑडियो व्हिज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत. एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे, अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे. दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते.

       सन १९०५साली श्री.बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या मित्रोदय या मासिकाने दिवाळी विशेषांक काढला होता. नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ असा उल्लेख या मासिकावर होता. पूर्णपणे वाङ्मयाला प्राधान्य देणारा हा अंक होता. २४ पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा मजकूर होता. १६ पाने मराठीत आणि ८ पाने इंग्रजीत होती. रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा.गो.आपटे यांच्या संपादनाखाली प्रकाशित आनंद मासिकाच्या सन १९०७ आणि १९०८च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळीनिमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते. दिवाळी अंक या उद्देशास वाहून घेतलेल्या पहिल्या दिवाळी अंकाचा मान काशिनाथ रघुनाथ मित्र (२ नोव्हेंबर १८७१- २३ जून १९२०) यांनी संपादित केलेल्या सन १९०९साली प्रकाशित मनोरंजन दिवाळी अंकास जातो.

        ऑनलाईन आणि डिजिटल दिवाळी अंक- आरंभ मासिकाचा पहिला दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रकाशित झाला. हा दिवाळी अंक पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल असून मासिक फक्त अँड्रॉइड ऍप्प द्वारे प्रकाशित होते. याचे संपादक आहेत अभिषेक ठमके. दिवा प्रतिष्‍ठान ही दिवाळी अंकांच्‍या संपादकांची संघटना होय. या संघटनेचे चौदावे अधिवेशन पुण्‍यात महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेत संपन्‍न झाले होते. विविध विषयावरील परिसंवाद, चर्चासत्रे आणि दिवाळी अंक वाचक स्‍पर्धांचे पुरस्‍कार वितरण असा भरगच्‍च कार्यक्रम घेण्‍यात आला. या अधिवेशनास दिवाळी अंकांच्‍या संपादकांसह रसिकही मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन उद्योजक भारत देसडला यांच्‍या हस्‍ते तर ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म.कडू यांच्‍या उपस्थितीत झाले. ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे अध्‍यक्षस्‍थानी होते. दिवाळी अंक हे महाराष्‍ट्राचे वैभव आहे. दिवाळी अंक वाचणे संस्‍कृतीचे लक्षण होते. आजच्‍या काळात लोकांना मोबाईल घडवत आहे. जेव्‍हा आपण पुस्‍तक वाचतो तेव्‍हा आपल्‍यात आणि पुस्‍तकामध्‍ये कोणी नसतो. प्रत्‍येक पान आपल्‍यावर संस्‍कार करत असते. वाचन संस्‍कृतीमुळे निर्णय घेण्‍याची क्षमता येते, अशा शब्‍दात ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या होत्या. दिवाळी अंक हे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचे भूषण आहे. दिवाळी अंकांमुळे अनेक साहित्यिक प्रकाशात आले. अनेकांना जीवन जगण्‍याची उमेद प्राप्‍त झाली, असे नमूद करुन त्‍यांनी आपल्‍या साहित्यिक वाटचालीतील अनुभव सांगितले होते.

     महाराष्‍ट्राला व्‍यंगचित्रकारांची मोठी परंपरा असून वयाच्‍या ऐंशीव्‍या वर्षीही प्रभाकर झळके यांच्‍यासारखे व्‍यंगचित्रकार उत्‍साहाने आपले योगदान देत असल्‍याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. दिवा प्रतिष्‍ठान संपादकांच्‍या प्रश्‍नांवर काम करत असतानाच वाचकांसाठीच्‍या स्‍पर्धेचे आयोजन करुन पुरस्‍कार वितरण करते, याबद्दलही त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म.कडू यांनी दिवाळी अंकांचे महत्‍त्व कमी होणार नाही, असे नमूद करत नवनवीन विषयांवर दिवाळी अंक निघत असून त्‍यांचा खपही चांगला असल्‍याचे लक्षात आणून दिले. दिवाळी अंकांच्‍या संपादकांनी सांस्‍कृतिक गरजा आणि चौकटी विस्‍तारीत करण्‍याबद्दल विचार करावा, असे आवाहन केले. भाषा आणि चित्राची रेषा एकाच ताकदीने पावलावर पाऊल ठेवून चालल्‍या तर ते साहित्‍य दर्जेदार होते. संपादकांनी दिवाळी अंकातून चांगले लेखक, चित्रकार, वाचक निर्माण होण्‍यासाठी प्रयत्‍न करावे, असेही ते म्‍हणाले. उद्घाटक भारत देसडला यांनी दिवाळी अंकांचे संपादक आणि शेतकरी यांची जातकुळी एकच असल्‍याचे सांगितले. शेतकरी निसर्गाने कितीही अन्‍याय केला तरी शेती करत असतो, हे या बळीराजाचे समाजावर एक प्रकारचे उपकारच आहेत. दिवाळी अंकांचे संपादकही वाचनसंस्‍कृती जपण्‍यासाठी तन-मन-धनाने प्रयत्‍न करीत असतात. चंद्रकांत शेवाळे यांनी प्रास्‍ताविकामध्‍ये अधिवेशनाच्‍या आयोजनामागचा हेतू विशद केला. राज्यात बाराशेच्‍या आसपास दिवाळी अंक निघत असले तरी व्‍यावसायिक स्‍तरावर सुमारे तीनशे अंक निघतात. सन १९९८च्‍या सुमारास दिवा प्रतिष्‍ठानची स्‍थापना झाली. अंक किती छापावे? वितरण कसे करावे? या प्रश्‍नांसोबतच वितरक, संपादक, प्रकाशक, लेखक आणि वाचक यांच्‍यामध्‍ये सुसंवाद निर्माण होण्‍यासाठी हे अधिवेशन नियमितपणे भरवण्‍यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात दिवाळी अंक वाचक स्‍पर्धेच्‍या सन २०१५ व २०१६च्‍या पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात आले. सन २०१६चा सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. सर्वोत्‍कृष्‍ट वाचकाचा प्रथम पुरस्‍कार रागिनी पुंडलिक पुणे, द्वितीय पुरस्‍कार कल्‍पना चिंतामणराव मार्कंडेय औरंगाबाद आणि तृतीय पुरस्‍कार सौरभ साबळे मलकापूर कराड यांना वितरीत करण्‍यात आला. सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्‍कार हास्‍यधमाल या अंकाचे संपादक महेंद्र देशपांडे यांनी स्‍वीकारला. सर्वोत्‍कृष्‍ट लेखक पुरस्‍कार अमोल सांडे, सर्वोत्‍कृष्‍ट लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी लेखिका रेखा खानपुरे, सर्वोत्‍कृष्‍ट कवी पुररस्‍कार विलास कऱ्हाडे, सर्वोत्‍कृष्‍ट ज्‍योतिषविषयक दिवाळी अंक पुरस्कार ज्‍योतिष ओनामा, पंडित विजय जकातदार, वाचकांनी निवडलेला सर्वोत्‍कृष्‍ट वैशिष्‍ट्यपूर्ण दिवाळी अंक पुरस्‍कार डॉ. सतीश देसाई संपादित पुण्‍यभूषण या दिवाळी अंकास प्राप्‍त झाला. दुपारच्‍या सत्रात दिवाळी अंक आणि विनोदी साहित्‍य या विषयावर मसापचे कार्याध्‍यक्ष प्रा. मिलींद जोशी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्‍ये 'आवाज'चे संपादक भारतभूषण पाटकर,ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार प्रभाकर झळके, विनोदी लेखक सुभाष खुटवड यांनी भाग घेतला. भारतभूषण पाटकर म्‍हणाले, आवाजसाठी एकेकाळी बाळासाहेब ठाकरे, त्‍यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी व्‍यंगचित्रे रेखाटली. व्‍हॉटस्अपसारख्‍या साधनांमुळे वाचनसंस्‍कृती लोप पावत चालली आहे, त्‍यामुळे इ-बुक सारख्‍या नव्‍या माध्‍यमांचाही वापर करावा लागत आहे. आवाजसाठी उत्‍कृष्‍ट साहित्‍य निवडीसाठी परीक्षण समिती असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी व्‍यंगचित्रांबाबत वाचक साक्षर झाले पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले. समाजात वावरत असतांना कान-डोळे उघडे ठेवायचे, वाचन करायचे. असे केले की आजू-बाजूच्‍या व्‍यक्‍तींच्‍या वागण्‍या-बोलण्‍यातून होणारा विनोद सहज लक्षात येतो, यामध्‍येच व्‍यंगचित्रांच्‍या कल्‍पना मिळतात. व्‍यंगचित्रात चित्रही असते आणि साहित्‍यही असते. भविष्‍यात व्‍यंगचित्रकार, विनोदी लेखक आणि वात्रटिकाकार यांचे एकत्रित संमेलन व्‍हावे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. व्‍यंगचित्र, विनोदी लेख, वात्रटिका हे निखळ हास्‍य निर्माण करतात, ते नैसर्गिक हास्‍य असते. कृत्रिम हास्‍यापेक्षा विनोदांतून निर्माण होणा-या हास्‍याचा आनंद वाचकांनी घ्‍यायला हवा, असे ते म्‍हणाले. प्रा.मिलींद जोशी यांनी जीवनातील विनोदाचे महत्‍त्व सांगितले. जीवनात हास्‍य असलेच पाहिजे, जीवनाचे हसे झाले नाही पाहिजे, असे नमूद करुन आजही विनोदाला मागणी असून विनोदी लेखकांनी विनोदाकडे गंभीरपणे पहावे, असे आवाहन केले. विनोद कमी होणे, हास्‍य लोप पावणे हे सांस्‍कृतिक अधोगतीचे लक्षण असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

      दिवाळी अंक आणि कविता यात  कविता या वाङमय प्रकारास महत्‍त्वाचे स्‍थान असते. हा एक सर्वश्रेष्‍ठ वाङमय प्रकार आहे. कमी शब्‍दात गहन आशय सामावलेला असतो. कवितांमुळे दिवाळी अंकांचे सौंदर्य वाढते. संपादकांनी चोखंदळपणे कवितांची निवड करुन आपापल्‍या अंकांत स्‍थान द्यावे, संख्‍यात्‍मक विचार करण्‍यापेक्षा गुणात्‍मक विचार व्‍हावा, असे वाटते. आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. नवनवीन माध्‍यमांचे आक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत वाचनसंस्‍कृती टिकवून ठेवण्‍याचे काम दिवाळी अंक करीत आहेत. दिवाळी अंक महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिक वैभव आहे. दिवाळी अंकांना ऐतिहासिक परंपरा असून तिचे जतन करण्‍याची जबाबदारी मराठी माणसावरच आहे.

         हल्ली मराठी नियतकालिकांच्या सृष्टीत प्रतिवर्षी दिवाळी विशेषांक एक विलक्षण पर्वणी असते. लेखक, प्रकाशक, संपादक व वाचक, सर्वांचाच उत्साह तेव्हा जणू शिगेला पोचतो; ललित वाङ्मयाच्या अनेक शाखांमधील प्रतिवर्षाच्या स्थितिगतीचे स्वरूप एकदम लक्षात येण्याला वाव मिळतो.  या योजनेला मनोरंजनने चालना दिली. मनोरंजनने आपल्या सन १९०९च्या नोव्हेंबरच्या अंकात दिवाळीसंबंधी काही खास लेख घालून आणि अधिक कविता व गोष्टी देऊन दिवाळीनिमित्त आपला पहिला थोडा मोठा अंक काढलेला आढळतो. असे असले तरी खऱ्या अर्थाने मराठी नियतकालिकांच्या सृष्टीतील खरा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला होता. बालकवींची आनंदी आनंद गडे चंद्रशेखर यांची कवितारति या प्रसिद्ध कविता, वि.सी.गुर्जरचे वधूंची अदलाबदल हे प्रसिद्ध प्रहसन आणि महाराष्ट्रातील तत्कालिन प्रसिद्ध लेखक, प्रकाशक, वकील, मुत्सद्दी, नट इत्यादींची छायाचित्रे ही त्या अंकाची काही वैशिष्ट्ये होती. पुुढील वर्षीच्या म्हणजे सन १९१०च्या मनोरंजनच्या दिवाळी अंकातील महाराष्ट्राला चिरस्मरणीय अशा जवळजवळ एकशे-पंधरा विभूतींची दुर्मीळ छायाचित्रे व त्रोटक चरित्रे आणि वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा या विषयावरील विद्वानांचा परिसंवाद, या दोन विशेष लक्षणीय गोष्टी होत्या. प्रत्येक दिवाळी विशेषांक हे नेहमी जनप्रबोधन करणारे आणि चोखंदळ वाचक पसंतीचे ठरून वाचनसंस्कृतीत सातत्याने वृद्धी करणारे असले पाहिजेत, ते अश्लिलता, बिभत्सता, भंपकता, अंधश्रद्धा वाढविणारे कदापिही नसावेत, हीच एक रास्त अपेक्षा!

    - संकलन व शब्दांकन -

                      श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                      रामनगर, गडचिरोली.

                      फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.


                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या