🌟जिल्ह्यातील नागरिकांनी कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रीय क्षयरुग्ण शोध 2023-24 मोहीम 20 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2023 दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, नागरिकांनी अंगावर चट्टा आढळून आल्यास त्याची तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती बैठक पार पडली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी मोहिमेबाबत सादरीकरण केले. या मोहिमेचा उद्देश समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे असून, ग्रामीण भागातील सर्व लोकसंख्या व शहरी भागातील निवडक लोकसंख्येमधील सर्व सदस्यांची कुष्ठरोग तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आशा व पुरुष स्वंयसेवक हे सदरील कालावधीत आपल्या घरी येणार आहेत. आशा व स्वयंसेवकांना तपासणीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तरी सर्वांनी आपली शारीरिक तपासणी करून घेत आपल्याला कुष्ठरोग व क्षयरोग नसल्याबाबतची खात्री करून घ्यावी व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.
शरीराच्या कोणत्याही भागावर तांबूस किंवा न खाजनारा, न दुखणारा व बधिर चट्टा किंवा चटटे आढळून आल्यास, पांढुरका व त्वचेच्या रंगापेक्षा फिक्कट असलेला चट्टा, हातापायांना मुंग्या येणे व हातापायाला बधिरता येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा तेलकट व चकाकणारा होणे, आदी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ चाचणी करून घेत कुष्ठरोग नसल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....
*****
0 टिप्पण्या