🌟खासदार संजय जाधव यांच्या गंभीर आरोपाने माजली खळबळ🌟
परभणी (दि.२८ ऑक्टोंबर) : दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत अधिकारी व ट्रॅव्हल्सधारकांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केला.
खासदार जाधव हे निजामाबाद ते पंढरपुर या एक्सप्रेसने परभणीहून पंढरपूरकडे रवाना झाले. त्यावेळी परभणी ते परळी या दरम्यान या एक्सप्रेसने तब्बल साडेचार तासाचा कालावधी घेतला. पुढेसुध्दा याच पध्दतीने एक्सप्रेस मंद गतीने पुढे सरकली. या प्रकाराने खासदार जाधव हे चांगलेच भडकले. परळी रेल्वेस्थानकावर माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी गाठल्यानंतर खासदार जाधव यांनी रेल्वेच्या या अभूतपूर्व कारभाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. निजामाबाद ते पंढरपुर ही वारकर्यांकरीता एक्सप्रेस सुरु करण्यात आली खरी, परंतु, पॅसेंजर बरी, अशी या एक्सप्रेसची अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी या एक्सप्रेसला थांबवले जाते. मालगाड्या, पॅसेंजर गाड्यांना पुढे सरकवले जाते. का? तर, एक्सप्रेसला मोठा लूज टाईम आहे. परळीच्या पुढेसुध्दा लूज टाईम मोठा आहे. हा लूज टाईम कमी करावा, यासाठी आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना सातत्याने बोललो, परंतु, हे अधिकारी दाद लागू देत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. वडगाव सारख्या स्टेशनवर तासन्तास एक्सप्रेस उभी करणे म्हणजे प्रवाशांचा जीवघेणा प्रकारच होय, अशी टिका करतेवेळी या एक्सप्रेसमध्ये पिण्याचे पाणी नाही, सांडपाण्याचीही बोंबाबोंब आहे. एकंदरीत वारकर्यांकरीता सोडलेल्या या एक्सप्रेसची दशा भयावह आहे, असे ते म्हणाले.
नांदेड-पुणे, पनवेल-पुणे या रेल्वेगाड्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळत असतांना रेल्वे विभागाने या दोन्ही एक्स्प्रेसचे पाच डब्बे कमी करीत मराठवाडावासीयांची क्रुर चेष्टाच सुरु केली आहे, अशी टिका करतेवेळी जाधव यांनी ट्रॅव्हल्सधारक व रेल्वे अधिकारी यांचे मोठे साटेलोटे आहे. या संदर्भात आपण व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संसदेतसुध्दा असा आरोप केला होता, याची आठवण करुन देतेवेळी जाधव यांनी पुणे, मुंबईच्या गाड्यांना मराठवाड्यातून मोठी डिमांड असतांना केवळ ट्रॅव्हल्सधारकांचे खिसे भरावेत म्हणून रेल्वेचे अधिकारी बिनधास्तपणे रेल्वेगाड्या विलंबाने सोडणे, डब्बे कमी करणे, मेगा ब्लॉक करण्यासारखे कुटीर उद्योग करीत असतात, असेही जाधव यांनी नमूद केले.
रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत यासंदर्भात आपण वारंवार बोलले, आता यापुढे बोलणार नाही, प्रखर आंदोलन उभे करुन रेल्वे अधिकार्यांना भानावर आणू, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या