🌟सिमेंट रोड मध्ये सार्वजनिक हॅन्डपंप दफन करणाऱ्या कंत्राटदार व अभियंते यांची भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करा....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे उपहासात्मक मागणी🌟


परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहेत. या रस्त्याच्या कामांवर व संबंधित कंत्राटदार व अभियंत्यावर महानगरपालिकेचा कुठलाही अंकुश नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. शहरातील रस्ते निर्मितीमध्ये होत असलेल्या गंभीर चुकांबाबत महानगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रार करुनही काहीही उपयोग होत नाही. परभणी शहर महानगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची मिली भगत असून महानगरपालिका प्रशासन अशा बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे.


परभणी शहरातील कारेगाव रोड वरील सिध्दीविनायक नगर मधील सिध्दीविनायक मंदीर शेजारी महानगरपालिकेकडून दोन दिवसापुर्वी सी.सी. रोडचे काम करण्यात आले या रस्त्याचे काम करीत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या महानगरपालिकेचा चालू स्थितीतील सार्वजनिक हॅन्डपंपची उंची न वाढविता रस्त्या करण्यात आला. या हँडपंप च्या चारी बाजूने काँक्रीट टाकल्याने अर्धा हॅन्डपंप सी. सी. रोड मध्ये गेला आहे त्यामुळे हा हॅन्डपंपचा वापर करणे शक्य नाही व या हॅन्डपंप वरती मनपाने केलेला खर्च पाण्यात गेला आहे. संबंधित प्रकरणामध्ये दोषी असलेल्या कंत्राटदार तसेच कामावर देखरेख करणारे कनिष्ठ अभियंता व शहर अभियंता यांच्यावर तात्काळ कार्यवाही करुन संबंधित रस्त्याच्या कामाचे बील रोखण्याच्या सुचना मनपाला देण्यात याव्यात व संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच संबंधित कंत्राटदार मनपाचे कनिष्ठ अभियंते व शहर अभियंता या सर्वांना भारत रत्न देण्यात यावा व या साठी जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारकडे तशी शिफारस करावी अश्या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी स्वीकारले.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, शहर चिटणीस वैभव संघई, शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, रामेश्वर पुरी, ऋषिकेश जाधव, शेख अल्ताफ, बाळासाहेब नरवडे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या