🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने केली मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांची क्रुर चेष्टा....!


🌟प्रवाशी महासंघांचा गंभीर आरोप : मराठवाडा सोडा आंदोलन करणार🌟

परभणी (दि.16 ऑक्टोंबर) : गेल्या काही वर्षांपासून दक्षिण मध्य रेल्वे विभागाने मराठवाड्यांच्या रेल्वे प्रवाशांवर सणासुदीसह उन्हाळी सुट्ट्या किंवा अन्य हंगामात जादा गाड्या तर दुर जादा डब्बेसुध्दा जोडले नाहीत, उलटपक्षी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा धंदा वाढावा या करीता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कृती करीत मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा क्रुर प्रकार सातत्याने केल्याचा गंभीर आरोप रेल्वे प्रवाशी महासंघाने केला आहे.

            ‘अंग्रेजों भारत छोड़ो’ धर्तीवर दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने ‘मराठवाडा सोडा’ असे आंदोलन प्रवाशी महासंघातर्फे करण्यात येणार आहे, असे या महासंघाने म्हटले.  15 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. परंतु, नांदेड विभागातून अद्याप विशेष रेल्वेची सोय नाही. उन्हाळी सीजन मध्ये विशेष गाड्यांपासून वंचित ठेवल्या नंतर आता परत एकदा प्रवाशांना हव्या असलेल्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, गोवा रेल्वे पासून वंचित करण्यात येत आहे. खासगी वाहतूकदाराने दीपावलीसाठी आत्तापासूनच पुणे साठी तीन हजार तर मुंबई साठी पाच हजारांच्या वर भाडे लावून दिवसाढवळ्या मराठवाड्यातील प्रवाशांची लूट चालविली आहे, असे म्हटले.

            रेल्वे प्रश्‍नांबाबत निजाम राजवटीतून मराठवाड्याला अद्याप मुक्ती मिळालेली नाही. फक्त नाव बदलून दक्षिण-मध्य रेल्वे विभागाच्या नावावर अजून जुलुम करीत बळजबरीने त्यांच्या मनाने रेल्वे गाड्या सोडत आहेत. त्याच वेळी तेलांगण-आंध्रातील प्रवाश्यांच्या सोयीनुसार विभागातून अनेक रेल्वे गाड्या प्रवाश्यांच्या माथी मारण्यात येत आहेत. विभागातून सिकंदरबाद, हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, तिरूपती, विकाराबाद, अदिलाबाद, निजामाबाद, जम्मू, अमृतसर, दिल्ली, बीदर, रायचूरू, बेंगलूरू इत्यादी इतर राज्यातील शहरांना जाऊन येण्याची सोय केली आहे, त्याचवेळी पुणेसाठी वेटिंगचे तिकिट देखील उपलब्ध नाही. नागपूर, सोलापूर, गोवा इत्यादी  शहरांना अद्याप रेल्वेने संपर्क नाही. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांनंतर देखील मराठवाड्यातील जिल्हा केंद्र असणार्‍या संभाजी नगर येथून हिंगोली, लातूर, धाराशिव ला परस्पर जोडणारी रेल्वे नाही.  रिकाम्या गाड्या धावत असतांना दरवेळी  हैदराबाद, सिकंदरबाद, तिरूपती, आणि उत्तर भारताला जोडणार्‍या विशेष रेल्वे गाड्यांना बळजबरीने चालवून प्रवाश्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे, असेही नमूद केले.

           रेल्वे राज्य मंत्री आणि दहा एक खासदार असून देखील मराठवाड्याला रेल्वे सुविधांपासून हक्काच्या रेल्वे सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. प्रवाशी जनतेला सर्व प्रकारच्या रेल्वे सुविधा पासून वंचित करण्यात येत आहेत. नांदेड येथे डिविजन करून अदिलाबाद आणि निजामाबाद शहरांना जोडणार्‍या रेल्वे गाड्यांना वाढविले जात आहे. मागील दोन-तीन वर्षात कोरोना च्या नावाखाली  मराठवाडा विभागातील अनेक रेल्वे गाड्यांना बंद करण्यात आले आहेत. विभागात कोणत्याही नवीन रेल्वे योजना अंमलात येत नाहीयेत. नवीन रेल्वे, नवीन रेल्वे मार्गाची घोषणा नाही. केवळ लॉलीपॉप दाखवतांना, प्रत्यक्षात मात्र असलेल्या सुविधांमध्ये कपात करण्यात येत आहे. गाड्यांचा वेग वाढविणे, गाड्यांचा विस्तार, गाड्यांच्या फेर्‍या वाढविणे, गाड्यांचे कोचेस वाढविणे सर्वकाही ठप्प आहे, असे म्हटले.

            दसरा दिवाळी सण लक्षात घेता तात्काळ नांदेड-पुणे दरम्यान लातूर आणि मनमाड मार्गे आणखीन दोन नवीन रेल्वे सोडावे, संभाजी नगर-अकोला,  नांदेड-संभाजी नगर, नांदेड-गोवा, संभाजी नगर-मैसूरू, संभाजी नगर-कोल्हापूर, नागपूर-सोलापूर दरम्यान नवीन रेल्वे गाड्यांना चालविण्यात यावेत, अन्यथा अंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख, खदीर लाला हाशमी, रूस्तुम कदम, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित, श्रीकांत अंबोरे, नारायण तिथे, दशरथ माकणे, अनिल देसाई आदींनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या