🌟कित्तूर राणी चेन्नम्मा जयंती विशेष : निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवता....!


🌟मातृदेवता म्हणून राणी चेन्नमा प्रातःस्मरणीय ठरल्या आहेत. त्या कर्नाटकातील कित्तूर राज्याच्या राणी होत्या🌟

      _राणी चेन्नमा या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी होत्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध राणीने दिलेला लढा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. या राणीने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात सन १८२४ ते १८२९ सालापर्यंत शौर्याने लढा दिला आणि मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. हा ज्ञानवर्धक महत्वपूर्ण लेख श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या अविट शब्दांत जरूर वाचा... संपादक._


       त्यांची महती व शौर्य अशा शब्दांत कोरून ठेवलेले आढळून येते-

        "लक्ष्मीरहल्या चेन्नम्मा रूद्रमाम्बा सुविक्रमा|

        निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवताः||"

      मातृदेवता म्हणून राणी चेन्नमा प्रातःस्मरणीय ठरल्या आहेत. त्या कर्नाटकातील कित्तूर राज्याच्या राणी होत्या. राणी चेन्नमा या इंग्रजांविरुद्ध सन १८२४ साली सशस्त्र लढा देणाऱ्या वीरांगना होत्या. त्या कर्नाटकच्या लोकनायिका होत्या.

         राणी चेन्नमाचा जन्म दि.२३ ऑक्टोबर १७७८ रोजी पुणे-बेंगळूरू महामार्गावरील कर्नाटक राज्यातील जिल्हा बेळगाव कित्तूर- काकती गावातील किल्ल्यात झाला. आंध्रातील काकतीय लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील घुलप्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी झाला. लहानपणापासून चेन्नमाला तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारीचे युद्ध, भालायुद्ध अशा मर्दानी कलांची आवड तर होतीच, शिवाय या सर्व कलांंमध्ये तिने प्रावीण्यही मिळविले होते. चेन्नमाला कानडी, मराठी, उर्दू या भाषा अवगत होत्या. दिल्ली येथील विधानभवनात राणी चेन्नमा यांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन २००७ साली करण्यात आले आहे. राणी चेन्नमा यांना संस्कृत भाषा सुद्धा ज्ञात होती.

    वयाच्या १५व्या वर्षी त्यांचा विवाह  कित्तूर येथील मल्लसर्जा या राजकुमाराशी झाला. विधात्याने आयुष्य अगदी साधे सरळ आखून दिले नाही. सन १८१६ मध्ये तेथील सगळ्या विरांगनांसह महाराजा आणि  सन १८२४ साली त्यांचा एकुलता एक मुलगा राजकुमार मल्लसर्जा यांचेही निधन झाले. त्यामुळे कित्तूरच्या संपूर्ण राज्याची अवजड जबाबदारी राणीवर येऊन पडली. याही परिस्थितीत त्या मुळीच डगमगल्या नाहीत. केवळ त्यांच्या आयुष्याने थोडी कलाटणी घेतली एवढेच! कित्तूर राज्यासाठी वारसदार म्हणून राणींनी शिवलिंगप्पा यांना दत्तक घेतले. आता इंग्रजांनी आपले सारे लक्ष कित्तूरवर केंद्रित केले होते. इंग्रजी कायद्याप्रमाणे जे राजे निपुत्रिक मृत्यू पावतात, त्यांच्या राज्याचा कारभार इंग्रज हुकूमत आपल्या ताब्यात घेत असे. दत्तक मूल हे वारसदार म्हणून त्यांना मान्य नव्हते. कित्तूर आता इंग्रजांच्या राजवटीखाली जाऊ नये, म्हणून राणी चेन्नमा यांनी वेळीच तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर एल्फिन्स्टन यांना पत्र लिहून आपला मुद्दा प्रदर्शित केला. परंतू, इंग्रजांचे लक्ष्य तर संपूर्ण  भारतवर्षच गिळंकृत करण्याकडे लागले असताना चालून आलेली सुवर्ण संधी ते कशी काय सोडणार, नाही का? पत्राच्या उत्तरादाखल इंग्रजी सैन्याला पाचारण करण्यात आले. वीस हजाराच्या वर सैन्य आणि दारुगोळा घेऊन इंग्रजांनी कित्तूरवर हल्ला चढविला. राणी चेन्नमा यांनीही आपल्या सैन्यासह या हल्ल्याला कडवे प्रत्युत्तर दिले. इंग्रजांना नुसतीच हार पत्करावी नाही लागली, तर त्यांचे मोठे अधिकारी मारले गेले होते. त्याच बरोबर काही अति महत्वाचे अधिकारी युद्धबंधक बनविण्यात आले होते. बडा इंग्रज अधिकारी कॅपलीन यांच्याशी झालेल्या तहात या बंधकांना सोडण्यास आल्यास युद्ध थांबविण्यात येईल आणि कित्तूर स्वतंत्र राहील, असे ठरले. परंतू आपला शब्द प्राणपणाने पाळतील, ते इंग्रज कसले? त्यांनी फिरून वार केला. राणी चेन्नमांनी प्रयत्नांची शर्थ केली, प्राणांची बाजी लावली. तरीही त्यांना बंधक बनविण्यात इंग्रज यशस्वी झालेच. त्यांना बेळहोंगळ किल्ल्यात युद्धबंदी म्हणून कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे सेनापती संगोली रायन्ना यांनी युद्ध चालू ठेवले होते, पण तेही मारले गेले. कित्तूर आता पराभूत झाले. राणीचे दत्तकपुत्र शिवलिंगप्पा यांनाही वीरमरण पत्करणे भाग पडले होते. राणी युद्ध कैदेत जखडून असतानाच त्या वीरगतीला प्राप्त झाल्या. हरामखोर संगप्पा व हुराकडली या दोन सरदारांनी फितूर होऊन इंग्रजांना शहरात शिरण्याच्या चोरवाटा दाखविल्याने इंग्रजांनी किल्यात घुसून राणी चेन्नमाला पकडले होते. राणी चेन्नमाला इंग्रजांनी पकडून बेळहोंगळच्या कारागृहात ठेवले. त्याच कारागृहात दि.२१ फेब्रुवारी १८२९ रोजी राणी चेन्नमाचे दुःखद निधन झाले होते. इंग्रजांविरुद्ध लढा किती काळापासून सुरू होता, त्याचे जीतेजागते उदाहरण राणी चेन्नमा यांचा कित्तूर वाचविण्यास दिलेला प्राणांतिक लढा होय. 

!! चला तर, परत परत त्यांच्या जयंती व हौतात्म्य दिनी त्या मातृशक्तिला वंदन करून स्मरण करुया !!

           - संकलक -

                  श्री कृष्णकुमार गोविंदा  निकोडे गुरूजी. 

                  रामनगर वाॅर्ड नं. 20, गडचिरोली.

                 फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.


                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या