तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. गुरुजींनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. म्हणूनच महाराष्ट्रभर आज त्यांना आपले आराध्य दैवत मानून भक्ती करणारी अनेक श्रीगुरुदेव सेवा मंडळे स्थापित झाली आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या लेखणीतून जरूर वाचा... संपादक.
तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोपंत इंगळे होते. त्यांचा जन्म दि.३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स.१९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. महाराज सांगत-
"अरे! रिकामा कशाला फिरतं? तुझं गावच नाही का तीर्थ?।।धृ।। तुझ्या गावाची शाळा ही मोडली। धर्मशाळा तू शहरी का जोडली? याने निघतो का जीवनात अर्थ?।।२।।"
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल? याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात? याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. संतकवी महाशयांनी अशीच ललकारीही दिली-
"झाडझडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना। पत्थर सारे बॉम बनेंगे, नाव लगेगी किनारे।।"
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, याची त्यांना जाणीव होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. राष्ट्रसंत म्हणतात-
"सर्व ग्रामासि सुखी करावे। अन्न वस्त्र पात्रादि द्यावे।। परि स्वतः दुःखचि भोगावे। भूषण तुझे ग्रामनाथा।। ऐसेचि होवो जनी वनी। संतोष होईल माझिया मनी।। मित्रत्व वाढो त्रैभुवनी। तुकड्या म्हणे ध्येय हेचि।।" (पवित्र ग्रामगीता: अर्पण-पत्रिका: ओवी क्र.१ व ७)
सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक व सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. राष्ट्रसंत हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालवीत आहेत. देशभक्तांनी म्हटले-
"चेत रहा हैं भारत दुखसे, आग बुझाना मुश्किल हैं। उठा तिरंगा बढ़ावे छाती, अब बहिलाना मुश्किल हैं।।"
महिलोन्नती हाही महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब, समाज व राष्ट्र यांची व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते? हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे? हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. ग्रंथकार म्हणतात-
"याच गुणे 'मातृदेवो भव'! वेदाने आरंभीच केला गौरव। नररत्नांची खाण अपूर्व। मातृजाति म्हणोनिया।।" (पवित्र ग्रामगीता: दृष्टिपरिवर्तन पंचक: अध्याय २०वा: महिलोन्नती- ओवी क्र.८)
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय संतकवीवर्यांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. मृत्युंजय संतश्रेष्ठ म्हणतात- "तुकड्या कहे आँधी लाऊँ| मैं भी मर कर जी जाऊँ||"
वंद. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० अर्थात दि.११ ऑक्टोबर १९६८ रोजी गुरूकुंज मोहरी जिल्हा अमरावती येथे झाले. आजही त्यांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते. ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला आहे, हे विशेष!
!! वं.रा.सं.तुकडोजी महाराजांना पुण्यस्मरण सप्ताह निमित्ताने विनम्र अभिवादन !!
संतचरणधूळ- श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
(संत-लोक वाङ्मयाचे गाढे अभ्यासक व साहित्यिक)
द्वारा- श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर, गडचिरोली.
ता. जि. गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com
0 टिप्पण्या