🌟राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे 13 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन....!


🌟अशी माहिती डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे🌟

परभणी : परभणी डाक विभागातर्फे राष्ट्रीय टपाल सप्ताह अंतर्गत आजपासून १३ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

या राष्ट्रीय टपाल सप्ताहाची सुरुवात आज मंगळवार, (दि.10) पासून झाली असून, आज ‘वित्तीय सशक्तीकरण दिवस’ साजरा करण्यात आला असून, त्यात ‘डाक समुदाय विकास कार्यक्रम’ (डाक चौपाल) अंतर्गत विविध बचत योजना तसेच विमा योजनांची माहिती देण्यासाठी परभणी विभागांतर्गत सोनपेठ, लिखित पिंपरी आणि हिंगोली टपाल कार्यालय या तीन ठिकाणी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केंद्र, राज्य आणि स्थानिक आस्थापनांतील कर्मचारी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. 

  बुधवारी ‘फिलाटेली दिवस’ साजरा करण्यात येणार असून, परभणी डाक विभागातर्फे गांधी विद्यालय, एकता कॉलनी शाखा, परभणी येथे विद्यार्थ्यांसाठी फिलाटेली कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पोस्टाच्या तिकिटांची माहिती आणि संग्रह याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ‘ढाई आखर पत्रलेखन मोहीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल भारतातून नवीन भारतनिर्माण या विषयी विद्यार्थ्यांना पत्र लेखन करायचे आहे.

गुरुवारी रोजी ‘मेल आणि पार्सल’ दिवस साजरा करण्यात येणार असून, त्यादिवशी पोस्टमास्तर व वितरण कर्मचारी यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करून त्यांना वितरण प्रणालीविषयी माहिती देण्यात येणार आहे. 

  शुक्रवारी ‘अंत्योदय दिवस’ साजरा करण्यात येणार असून, या दिवशी परभणी डाक विभागातर्फे दुर्गम, ग्रामीण आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृतीसह ‘आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण’ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना थेट लाभ हस्तांतरण, जन सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आणि पोस्ट खात्याची इतर सेवा आणि उत्पादने यांच्या उपलब्धतेबद्दल जागरुकता करण्यात येणार आहे. तसेच परभणी प्रधान डाकघर, शनिवार बाजार येथे डाक सप्ताहानिमित्त 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या राष्ट्रीय डाक सप्ताहाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाक अधीक्षक श्री. खदीर यांनी केले आहे. 

***** 

वृत्त क्र. 559                  दि.10/10/2023 

                                   मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र समितीचा परभणी जिल्हा दौरा  

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून द्यावेत - जिल्हाधिकारी 

परभणी,दि.10(जिमाका):मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे सोमवार, (दि.16) रोजी परभणी जिल्हा दौऱ्यांवर येत असून, नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या मराठा-कुणबी, कुणबी –मराठा जात प्रमाणपत्राशी संबंधित पुरावे असल्यास या समितीकडे देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. पुरावे दुपारी 2 ते 4 या वेळेत या समितीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

समितीची बैठक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार आहेत. पुरावा शक्यतो साक्षांकित असावा, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे. 

*****

वृत्त क्र. 560                  दि.10/10/2023 

                         सेवा महिन्यात प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा  

- अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे

परभणी,दि.10(जिमाका): राज्य शासनाकडून सेवा महिना सोमवारपर्यंत राबविण्यात येत असून, या महिन्यात  नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी आज जिल्हा यंत्रणेतील विभागप्रमुखांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे त्यांनी जिल्हा यंत्रणेतील विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेतला, त्यावेळी  डॉ. काळे बोलत होते. 

    निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे, सुरेश शेवाळे यांच्यासह दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पाथरीचे शैलेश लाहोटी आणि तहसीलदार उपस्थित होते.  

दि. 17 सप्टेंबर ते दि. 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात सेवा महिना विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत सेवा महिन्यामध्ये जिल्हा यंत्रणेकडून विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवाविषयक विविध प्रकरणांचा आढावा घेतला असून, या विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवांसाठी सेवा हक्क कायद्याद्वारे विहीत केलेल्या कालावधीत ही प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी दिले. 

  येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून आपल्या विभागाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे, तक्रारी आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डीबीटी पोअर्ल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल विभागाच्या स्वत:च्या संकेतस्थळावरील प्रलंबित प्रकरणांचा 100 टक्के निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.  

  या कालावधीत वय व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, भूमीहिनांचे प्रमाणपत्र, अल्पभूधारकाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग ओळख प्रमाणपत्र, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, शिकाऊ चालकाचे प्रमाणपत्र, वाहन परवाना यासह विविध विभागामार्फत ऑनलाईन देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचे तात्काळ वितरण करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या