🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून आरोग्य सुविधेचा आढावा....!

 


🌟सामान्य रुग्णालयाला भेट देत केली पाहणी रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना🌟


 
🌟रुग्णालयातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश🌟 

परभणी (दि.०७ ऑक्टोंबर) : जिल्ह्यातील रुग्णांचा सर्व भार असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सकाळी भेट देत पाहणी केली. सामान्य रुग्णालयातील औषधालयाची पाहणी करत मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असल्याबाबत समाधान त्यांनी व्यक्त केले. तसेच सामान्य रुग्णालयात येणा-या रुग्णांवर तात्काळ योग्य ते उपचार करताना, प्रशासनाने रुग्णालयातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 


अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बन, अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव,  वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, डॉ. अमोल भालेराव यावेळी उपस्थित होते. 

सुरुवातीला अतिदक्षता विभागात जावून जिल्हाधिका-यांनी पाहणी केली. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून उपचाराबाबत  जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी माहिती घेतली. औषध विभाग, शस्त्रक्रिया विभाग, कान-नाक-घसा, अपघात विभाग, रेडिओलॉजी, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण यासह सामान्य रुग्णालयातील विविध विभागांमध्ये जावून रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. 

नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात कमी मनुष्यबळावरही चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यावर आरोग्य यंत्रणेचा भर असून, लवकरच रिक्त पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रक्रियाही  सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तसेच येथील प्रत्येक विभागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य विभागाला दिले. 

अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी  जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील यंत्रणा, तसेच आवश्यकतेपेक्षा तुलनेने कमी मनुष्यबळ असून, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारीवृंदाकडून रुग्णालय आणि परिसरातील साफसफाई याबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील रुग्णवाहिकांना तात्पुरत्या स्वरुपात का होईना वाहनचालक उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बन यांनी रुग्णालयातील औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णसंख्या जास्त असल्याचे सांगितले. तसेच राज्य शासनाकडून सर्वांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व सुविधा मोफत करण्यात आल्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे डॉ. बन यांनी सांगितले. हे रुग्ण जिल्हाभरातून परभणी येथे येत असल्यामुळे १०० टक्केपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण दाखल होणे आणि उपचार घेऊन परत जाणा-यांच्या संख्येचा विचार करता राज्यातील तिसरी सर्वात मोठी ओपीडी असल्याचेही डॉ. बन यांनी सांगितले. 

*सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष द्या - आमदार डॉ. राहुल पाटील

सामान्य रुग्णालयाची पाहणी करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणेच्या अधिका-यांसोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बन, अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बालाजी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण कदम,डॉ.अमोल भालेराव यावेळी उपस्थित होते. 

आमदार डॉ. पाटील यांनी यावेळी रुग्णालयातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे सांगून, रिक्त पदे कंत्राटी स्वरुपात का होईना लवकर भरण्याबाबत सांगितले. तसेच रुग्णालयातील विद्युत उपकरणांची दुरुस्ती, इमारतीतील किरकोळ दुरुस्ती, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, आगप्रतिबंधक उपकरणे तपासणे, येथील भूमिगत गटारींचे काम करणे, सौरपँनेलच्या माध्यमातून विजेवरील भार कमी करणे यासह स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या इमारती तात्काळ पाडण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या. तसेच रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची विनाविलंब दुरुस्ती करावी, असे सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. रामटेके यांच्याशी संपर्क साधून, जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच यासंदर्भात लवकरच वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यासाठी सूचना दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या