🌟मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम🌟
परभणी : देशातील लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींसह 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी सुधारित मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गंत आयोजित शिबिरांमध्ये आपल्या मतदारसंघातील मतदारयादीत नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून सुधारित मतदार नोंदणीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 राबविण्यात येत असून, त्यानुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.
जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत 18 आणि 19 नोव्हेंबर आणि 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून, या चार दिवसांमध्ये 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच या मोहिमेदरम्यान आपापल्या मतदारासंघातील युवक –युवतींचे नाव नोंदवून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आतापर्यंत जिल्ह्यात 1554 मतदान केंद्र होते. मात्र आता त्यात वाढ होऊन ती 1581 झाली असून, येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन मतदारयादीचे वाचन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण यादींवर दावे आणि हरकती 9 डिसेंबरपर्यंत स्विनकारल्या जाणार असून, 26 डिसेंबरपर्यंत ते निकाली काढण्यात येणार आहेत. तर 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
5 जानेवारी 2023 पासून ते शुक्रवार, दि. 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत झालेल्या नावनोंदणीनुसार प्रसद्धि झालेल्या प्रारुप मतदार यादीत 2821 मतदारांमध्ये वाढ झाली असून, 1974 मतदारांची नावे कमी झाली आहेत. परभणी मतदारसंघात 1936 मतदार वाढले असून, 3260 मतदार कमी झाले आहेत. गंगाखेडमध्ये 2856 मतदारांची वाढ तर 3067 मतदार वगळले असून, पाथरी मतदारसंघात 5276 मतदार वाढले असून, 2525 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.
5 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार आतापर्यंत 20 हजार 639 मतदार नोंदणी झाली असून, त्यामध्ये 12 हजार 889 निव्वळ मतदार वाढले आहेत. तर त्यापैकी 10 हजार 826 मतदार वगळण्यात आले आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 92 हजार 704 पुरुष, 1 लाख 78 हजार 307 स्त्री तर 11 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 71 हजार 22 मतदार आहेत. 96-परभणी विधानसभा मतदारसंघात 1 लाख 68 हजार 604 पुरुष आणि 1 लाख 57 हजार 9 स्त्री तर 8 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 25 हजार 621 मतदारांचा समावेश आहे. 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 11 हजार 920 पुरुष आणि 1 लाख 94 हजार 516 स्त्री तर 5 तृतीयपंथी असे एकूण 4 लाख 6 हजार 441 एकूण मतदार आहेत. 98-पाथरी विधानसभा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 3 पुरुष आणि 1 लाख 80 हजार 106 महिला तर एका तृतीयपंथीयाचा समावेश असून, 3 लाख 76 हजार 110 एकूण मतदार आहेत. शुक्रवार, दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता 7 लाख 69 हजार 231 पुरुष, 7 लाख 9 हजार 938 महिला तर 25 तृतीयपंथीयांचा समावेश असून, 14 लक्ष 79 हजार 194 एकूण मतदार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावर्षीच्या मतदार नोंदणीचे अवलोकन केले असता, 18-19 या वयोगटातील मतदारांचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण 0.38 टक्के आहे. वास्तविक पाहता ते 3.18 टक्के असणे आवश्यक आहे. या वयोगटातील एकूण मतदार 8 हजार 62 एवढेच आहेत आणि एकूण लोकसंख्येतील आज या वयोगटाची लोकसंख्या ही 1 लाख 9 हजार 507 एवढी आहे. त्यामुळे जास्तीत –जास्त जनजागृती करुन आणि युवक-युवतीस नावनोंदणी करण्यास सांगून नवीन मतदार वाढविण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
येत्या 9 डिसेंबर पर्यंत प्रत्येक नवमतदाराने मतदार यादीमध्ये नावनोंदणी करावी. तसेच प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून, महिला, युवती मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले. मतदारयादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी नमुना क्रमांक 6, नावात दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक 8, मयत अथवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे मतदारयादीतून वगळणी करण्यासाठी नमुना क्रमांक 7 चे अर्ज केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अथवा व्होटर हेल्पलाईन ॲप च्या माध्यमातून दाखल करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. नवमतदारांना हा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निवृत्ती गायकवाड यावेळी उपस्थित होते......
*****
0 टिप्पण्या