🌟परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून जिल्हा सामान्य व स्त्री रुग्णालयाची अकस्मात तपासणी....!


🌟भेटीत आरोग्य यंत्रणा व जीवरक्षक औषधी साठ्याची तपासणी🌟 

🌟जिल्हाधिकारी गावडे यांनी साधला रुग्णांशी संवाद; सोयीसुविधांचा घेतला आढावा🌟


परभणी (दि.१५ ऑक्टोंबर): शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सकाळी अकस्मात भेट देत आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांना देण्यात येणा-या सोयीसुविधा, उपचार आणि जीवरक्षक औषधी साठ्याची तपासणी केली. 


जिल्हा सामान्य रुग्णालयातील या भेटीत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी औषधीसाठ्याची पाहणी करत साठा मुबलक प्रमाणात असल्याबाबत खात्री करून घेतली. तसेच सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात जावून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील, उपस्थित डॉक्टर व उपचारार्थ दाखल रुग्णांशी संवाद साधून  तात्काळ उपचार होत असल्याबाबत रुग्णांकडून माहिती घेतली.सुरुवातीला आपत्कालीन कक्ष, अतिदक्षता विभागात तसेच संपूर्ण विभागनिहाय भेटी देत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पाहणी केली. यावेळी रुग्णालयात डॉक्टरांची उपस्थिती, औषधसाठ्याची तपासणी करताना उपचार घेणा-या रुग्णांशी चर्चा करत माहिती घेतली. 

जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी विविध विभागांमध्ये जावून रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातही आकस्मिक भेट देवून तेथील आरोग्यविषयक सोयीसुविधांचा आढावा घेतला. येथेही त्यांनी महिला रुग्णांशी संवाद साधून, येथील आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांना देण्यात येणा-या आरोग्यविषयक सोयी सुविधांची पाहणी करत समाधान व्यक्त केले यावेळी त्यांचे स्वीय सहायक कैलास मठपती उपस्थित होते. जिल्हा स्त्री रुग्णालयात आकस्मिक भेट देत तपासणी करताना अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव उपस्थित होत्या.......

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या