🌟जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
परभणी (दि.२६ ऑक्टोंबर) : येत्या 1 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' हे अभियान राबविण्यात येणार असून, अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे मुख्य मार्गदर्शक राहणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाच्या पूर्वतयारीचा संबंधितांकडून आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजिंक्य पवार, उप विभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, ओमप्रकाश यादव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, परभणीचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मनपाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी (1 नोव्हेंबर) अन्नपूर्णा लॉन्स येथे अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकही दिव्यांग बांधव शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज यंत्रणेच्या विभागप्रमुखांना पूर्वतयारीबाबत सूचना दिल्या. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश देत कार्यक्रमाच्या ठिकाणी येणा-या लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देणा-या स्टॉल्सची उभारणी करणे, एलईडीच्या माध्यमातून योजना, लाभार्थ्यांचे मनोगत दाखवणे, त्यांच्या यशकथा आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करणे, दिव्यांग बांधवांच्या बैठकीची व्यवस्था करणे, कार्यक्रमस्थळापासून जवळच पार्कींग ठेवणे, दिव्यांगांच्या मदतीला एनसीसी आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांचीही मदत घेण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून अनुषंगीक कामे पूर्ण करावीत. व्यासपीठावर अध्यक्षांच्या हस्ते 25 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी अग्निशमन व्यवस्था, स्वच्छतेच्या अनुषंगाने साफसफाई करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, डस्टबीन व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था व सफाई करणे, स्टॉल्सची उभारणी, दिव्यांगांच्या प्रकारानुसार बैठक, रँम्पवॉकची व्यवस्था करणे, वाहनतळ, वाहतूक नियोजन पथक, विद्युत व्यवस्थापन आणि पुरवठा करणे, वैद्यकीय सहाय्य व रुग्णवाहिका व्यवस्था करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी करावी. आपत्ती व्यवस्थापन तसेच लाभधारकांची विभाग व योजनानिहाय माहिती संकलित करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना दिल्या.....
******
0 टिप्पण्या