🌟हात धुवा दिवस : दूर घालवाया कोरोना ; आता तरी हात धुवाना....!🌟हात धुण्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी जागतिक सर्वेक्षणातून लक्षात आल्या आहेत🌟

माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. बहुतांश वेळेला माणूस आपल्या हाताने अन्नाचे सेवन करतो. अशावेळी हात स्वच्छ नसतील तर माणूस स्वतःच अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. परिसरात, आजूबाजूला अनेक ठिकाणी असंख्य जिवाणू असतात. आपण विविध काम करत असताना ते आपल्याही हाताला नकळत चिटकलेले असतात. अन्न खाण्यापूर्वी आपण हात स्वच्छ धुतले नाही तर हेच जिवाणू आपल्या पोटात जातात. आपण आजारी पडतो. यावरून आपल्या लक्षात येते, की हात धुणे ही मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. युनिसेफने विविध गरीब आणि विकसनशील देशात यावर काम करण्यास सुरुवात केली. सन २००८ साली स्वीडनमधील स्टॉकहोम येथे पहिला जागतिक जल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. याच ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेने १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे ठरवले. सन २००८ साली साजऱ्या झालेल्या या पहिल्या जागतिक हात धुवा दिनामध्ये जगभरातील ७० पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते सुमारे दोनशे दशलक्ष लोकांनी या दिवशी साबणाने हात धुतले अशी महत्त्वाची माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी- अलककार यांनी या लेखातून देत आहेत - संपादक.

     कोरोनाची साथ पसरत असताना याला प्रतिबंध घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि सरकारी आरोग्य विभागाकडून मुख्य उपाय सांगितला जात आहे. तो म्हणजे वारंवार हात धुवा, तेही शास्त्रशुद्ध पद्धतीने. हात धुण्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी जागतिक सर्वेक्षणातून लक्षात आल्या आहेत. रिस्क अ‍ॅनॅलिसिस या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नियत कालिकाच्या दि.२३ डिसेंबर २०१९च्या अंकात त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यानुसार ३० टक्के व्यक्ती शौचास जाऊन आल्यावर अजिबात हात धुत नाहीत. ज्या ७० टक्के व्यक्ती हात धुतात, त्यातले निम्मे लोक केवळ पाण्याने हात ओले करतात आणि पुसतात. केवळ २ टक्के व्यक्तीच शास्त्रशुध्द पद्धतीने हात धुतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ जगभरात हात कसे धुवावेत, याचे प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना देण्यावर भर देत आहेत. या बाबतच्या जनजागृतीसाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिवस साजरा केला जातो. सुरुवातीला केवळ विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित असणाऱ्या या विषयाला कोविड-१९ मुळे एवढे महत्व आले, कि आता जीव वाचवण्यासाठी हात धुवा, असे म्हणण्याची वेळ जागतिक आरोग्य संघटनेवर आली आहे. या माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांची तक्रार करावी. अंगणवाडी व शाळेतील लहान मुलांमध्ये हात धुण्याचे संस्कार रुजविण्यासाठी गावातील अंगणवाडीताई व आशा वर्कर यांनी गीताच्या माध्यमातून मुलांमध्ये हात धुण्याच्या प्रक्रियेत एक गोडी निर्माण केली पाहिजे. सकाळी प्रार्थनेच्या वेळी लहान मुले हे गीत गाऊन स्टेप बाय स्टेप सामुहिक हात धुण्याचा उपक्रम घेतील. तेव्हा घराघरात हात धुण्याचा संदेश पोहोचवावा. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी. हात कधी धुवावे? स्वयंपाकापूर्वी, जेवण्यापूर्वी व जेवल्यावरसुद्धा, कोणत्याही आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी, त्यांना स्पर्श करण्यापूर्वी व नंतरही, कुठल्याही जखमेला हात लावण्यापूर्वी आणि नंतरही, शौचाला व लघुशंकेला जाऊन आल्यानंतर, लहान बाळाची शी धुतल्यानंतर, बाळाचे डायपर, लंगोट बदलल्यानंतर, नाक शिंकरल्यावर, शिंक आल्यानंतर, प्राण्यांना खाऊ घातल्यावर, त्यांची विष्ठा साफ केल्यावर, प्राण्यांना कुरवाळल्यावर किंवा हाताळल्यानंतर. घर झाडून-पुसून घेतल्यावर, कचरा टाकल्यानंतर किमान चाळीस सेकंद हात साबणाने स्वच्छ धुवावे. हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास कोरोना किंवा इतर संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का? अशी शंका अनेकांच्या मनात असेल. खरेतर कुठल्याही रोगाचा १०० टक्के प्रतिबंध शक्य नाही. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगाचा प्रसार नक्की रोखला जातो. म्हणूनच सामाजिक व वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. परंतु तसे होत नसल्याने दरवर्षी १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिवस म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ व स्वच्छ भारत अभियान याबाबत मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करीत आहेत. हात धुण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडावी, हाच हेतू आहे.

     हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध व इतिहास असा- इ.स.१८४०मध्‍ये डॉ.ईगनाज, सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये एका शैक्षणीक इस्पितळात ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्‍यू होत असे. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना गरोदरमातेस हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात, त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍यांच्‍यामार्फत घराघरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावकऱ्यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्‍यात यावी. पुष्‍कळ लोकांना हात कसे धुवावे हे माहितीच नाही. हात धुण्‍याच्‍या योग्‍य पद्धतीचे पाच टप्‍पे- १) सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. २) हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. ३) बोटे एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. ४) उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुसऱ्या हाताने करावी म्‍हणजे नखे स्‍वच्‍छ होतील. ५) पाणी वापरून हात खळवळून घ्‍यावेत. या पाच टप्‍प्‍याद्वारे हाताची स्‍वच्छता करणे गरजेचे आहे. याचे प्रात्‍यक्षिक प्रत्‍येक शाळेतून दरवर्षी १५ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले पाहिजेत. जिल्‍ह्यातील सर्व ग्राम पंचायती, शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या यांमधून कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले पाहिजेत. हात धुण्‍याच्‍या प्रात्‍यक्षीकातून लोकांना हात धुण्‍याची सवय लागेल. शालेय विद्यार्थ्‍यांमार्फत घरातील सर्व सदस्‍यापर्यंत हा संदेश जाणार आहे. या संदेशाचा सर्वस्‍तरातून वापर झाला तर सर्वांचे हात स्‍वच्‍छ राहतील. परिणामी रोगराईस आळा बसेल, यात शंकाच नाही!

!! यानिमित्ताने सर्वांना हात स्वच्छ धुण्यासाठी प्रेरणादायी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी- अलककार.                     गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३


                     .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या