🌟युवक-युवतींनी आपापल्या मतदारसंघात मतदारयादीत नावनोंदणी करून लोकशाहीला बळकट करण्याचे काम करावे....!


 🌟उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांचे नवमतदारांना आवाहन : मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम🌟

परभणी (दि.16 ऑक्टोंबर) : आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी आपापल्या मतदारसंघात मतदारयादीत नावनोंदणी करून लोकशाहीला बळकट करण्याचे काम करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी केले. कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय आणि तहसील कार्यालय, परभणीच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी नवमतदार जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. शेवाळे बोलत होते. 

1 जानेवारी 2024  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे नवमतदारांनी 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी करून घेणे आणि मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती करून नवमतदार व महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र चव्हाण, तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यावेळी व्यासपीठापर उपस्थित होते.

येत्या 9 डिसेंबरपर्यंत प्रत्येक नवमतदाराने मतदार यादीमध्ये नावनोंदणी करावी. तसेच प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून, महिलांनीही यामध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. शेवाळे यांनी केले. तसेच महिला,युवती मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारयादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी नमुना क्रमांक 6, नावात दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक 8, मयत अथवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे मतदारयादीतून वगळणी करण्यासाठी नमुना क्रमांक 7 चे अर्ज केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अथवा व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter HelpLine App) च्या माध्यमातून दाखल करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. नवमतदारांना हा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य राजेंद्र चव्हाण, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार संदीप राजापुरे,नायब तहसीलदार अनिता वडवळकर, लक्ष्मीकांत खळीकर,सुरेखा टाक यांच्यासह निवडणूक विभागाच्या चमूने प्रयत्न केले..... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या