🌟पंजाबराव देशमुख यांनी अंधश्रद्धेला मुठमाती देवून शिक्षणाला महत्त्व दिले - डॉ.अनंत मरकाळे

 


🌟शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते🌟


पुर्णा (दि.०४ ऑक्टोंबर) प्रतिनिधी - पंजाबराव देशमुख यांनी आपल्या जीवन कार्यात अंधश्रद्धेला मुठमाती देवून शिक्षणाला महत्त्व दिले असे प्रतिपादन डॉ. अनंत मरकाळे यांनी केले. ते श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचलित जीजामाता महाविद्यालय बुलढाणा व स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते. पुढे बोलताना डॉ. मरकाळे म्हणाले की  शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ पंजाबराव देशमुख यांनी स्वातंत्रपूर्व काळात १९३२ ला श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज विदर्भात त्याच्या संस्थेचे वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी महाविद्यालये असून अनेक महाविद्यालये आणि शेकडो शाळा वसतीगृह आहेत. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शेती धोरणात्मक अनेक कायदे केले. परदेशात मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून लंडन येथे वसतीगृह निर्माण केले. सामान्य माणसाला शिक्षण घेता यावे यासाठी लोकविद्यापीठाची स्थापना केली. शेतकरी कष्टकरी उपेक्षित शोषितांच्या उध्दारासाठी पंजाबराव देशमुख यांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ निलेश गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. डॉ. जे. जे. जाधव यांनी शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार व्याख्यानमालेचे आयोजक प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या