🌟'राजा राममोहन रॉय’ निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव पाठवावे......!


🌟इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे🌟

परभणी (दि. ३१ ऑक्टोंबर) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. 

अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. सन 2023-24 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सन 2023-24 साठीच्या समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेत 25 लाख, सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्यता इमारत बांधकाम, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान "ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य  व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्र स्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य आणि बालग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय “बालकोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य योजनांचा समावेश आहे. 

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानच्या www.rrlf.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे......

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या