🌟सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जात नोंदीसंबंधी पुराव्यांचा घेतला आढावा....!


🌟सर्व संबंधीत विभागांनी उपलब्ध नोंदी तपासून अचूक अहवाल तात्काळ सादर करावा🌟


परभणी (दि.19 ऑक्टोंबर) : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी आढावा बैठकीत समितीने परभणी जिल्ह्यातील मराठा समाजातील व्यक्तीना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, तत्कालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,  पोलीस अधीक्षक रागसुधा आर., विधी व न्याय विभागाचे सह सचिव सुभाष कऱ्हाळे, विभागीय उपायुक्त जगदीश मिनीयार, विभागीय उपायुक्त शिवाजी शिंदे, समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार, समितीचे सदस्य ॲड. अभिजीत पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी शिक्षण विभाग, भूमि अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक व मुद्रांक नोंदणी विभाग, यासह विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या नोंदींबाबतचे तालुकानिहाय अहवाल प्रत्यक्ष तपासून संबंधितांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित विभागांनी त्यांच्याकडील असलेल्या प्रत्येक नोंदीची तात्काळ तपासणी करून अचूक अहवाल सादर करावा. एकही कागदपत्र तपासाअभावी राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यक तिथे उर्दू, मोडी, फारसी, मैथली लिपीतील नोंदींबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घेवून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देशही यावेळी दिले. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्ह्यातील विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखांद्वारे तपासण्यात आलेल्या कागदपत्रावरील नोंदींची सविस्तर माहिती समितीसमोर सादरीकरणाद्वारे बैठकीत सादर केली. 

बैठकी नंतरच्या सत्रात जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडे सन 1967 पूर्वीचे उपलब्ध असलेल्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातविषयक पुरावे, कागदपत्रे समितीकडे सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्यानुसार आज जिल्ह्यातील 83 नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्याकडील पुरावे आणि निवेदने समिती समोर सादर केलीत. तसेच समिती अध्यक्ष यांनी नागरिकांनी सादर केलेले त्यांच्याकडील पुरावे तपासून तसेच स्वीकारून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी त्यांच्याकडे उर्दू, मोडी, फारसी, मैथली लिपीतील उपलब्ध असलेले नोंदींबाबतचे पुरावे संबंधित भाषा जाणकारांकडून तपासून घेत सादर करावेत. त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी समितीने माहिती दिली.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांच्यासह तहसीलदार आणि सर्व संबंधीत विभाग प्रमुख आढावा बैठकीस उपस्थित होते......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या