🌟शासकीय इतमामात अग्निवीर अक्षय गवतेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.....!


🌟गावकऱ्यांनी साश्रू नयनांनी अग्निवीर अक्षय गवते यांना दिला अखेरचा निरोप🌟

🌟अक्षय गवते शहिदांच्या सन्मान मिळालेला ठरला पहिला अग्नीवीर🌟 

शहीद अग्नीवीर गवतेच्या अंत्यदर्शनासाठी गावकऱ्यांची रीघ रांगोळ्यांच्या पायघड्या, अक्षय गवते अमर रहेच्या घोषणा; शोकाकुल वातावरणात अग्नीवीराला अखेरचा निरोप

चिखली :  बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील शहीद अक्षय गवते यांच्यावर आज त्यांच्या मुळगाव असलेल्या पिंपळगाव सराई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय गवते देशातील पहिला शहीद अग्निवीर ठरला आहे. याआधी कर्तव्यावर असलेल्या पंजाब येथील अग्निवीराला शहीदचा सन्मान मिळाला नव्हता, त्यावर मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अक्षय गवते या अग्निवीराला शहिदाचा सन्मान मिळाल्याने अक्षय गवते देशातील पहिला शहीद अग्निवीर ठरला आहे

शहीद अग्नीवीर अक्षय गवतेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना पोलिसांकडून हवेत ३ राऊंड फायर करून शहीद अक्षय गवतेला सलामी देण्यात आली. शहीद अग्नीवीर अक्षय गवतेला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.

आज सोमवारी (दि २३) सकाळी पावणे अकराच्या सुमारास लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव पिंपळगाव सराई येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातलग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची रीघ लागली. या वीर जवानाच्या पार्थिवाची गावातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी हजारो देशप्रेमींच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुलगाव (वर्धा) येथील जवान व पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. वडील लक्ष्मण गवते यांनी मुखाग्नी दिला.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, माजी  राहुलभाऊ बोंद्रे , आमदार विजयराज शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  नेते रविकांत तुपकर,  शाहू परिवाराचे व राजश्री शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, माजी नगराध्यक्ष सुरेशआप्पा  खबुतरे , माजी उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे , माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, बुलढाणा एसडीओ राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाद्रन लीडर( निवृत्त) रुपाली सरोदे, सैनिक कल्याण संघटक विष्णु उबरहंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह हजारो शोकाकुल नागरिक हजर होते. शेकडो विद्यार्थी हाती तिरंगा घेऊन हजर होते.

युनीट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात अक्षय गवते कर्तव्यावर होते. सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली. २० ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावल्यानंतर मध्यरात्री झोपेतच हृदयाघात झाल्याने अक्षयची प्राणज्योत मालवली होती.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या