🌟विस्फोटक अधिनियम २००८ मधील विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले 🌟
परभणी (दि.०१ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपासून दिवाळी सण सुरु होत असून, त्यानिमित्त इच्छुकांनी १५ दिवसांसाठी फटाके विक्रीच्या दुकानांचे तात्पुरते परवाने काढण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत विस्फोटक अधिनियम २००८ मधील विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
दिवाळी सणानिमित्त फटाके विक्री करण्यासाठी जिल्ह्यात तात्पुरते फटाके विक्रीची दुकाने थाटली जातात. या दुकानांच्या परवान्यांसाठी ‘द एक्स्प्लोसिव्ह रुल्स २००८’ मधील कलम ८४ व केंद्र शासनाच्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटना विभाग नवी दिल्ली यांचे परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार दुकाने थाटण्यासाठी परवान्यांची आवश्यकता असते.
परवाना काढण्यासाठी संबंधितांना प्रत्येक फटाके विक्री दुकानातील अंतर कमीत कमी ३ मीटर ठेवावे लागणार आहे. दुकाने मोकळ्या जागेत आणि प्रतिबंधित इमारतींपासून ५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर असावीत. प्रत्येक दुकानातील साठा हा जास्तीत जास्त १०० किलोपर्यंतच असावा. पोलीस अधीक्षकांच्या कायदा व सुव्यवस्था, अर्जदाराची वर्तणूक आणि दुकानाबाबतीत अर्जदाराने सर्व नियमांचे पालन करण्याबाबतचा सवर्कष अहवाल असावा. महाराष्ट्र नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम २८१ अन्वये संबंधित मनपा अथवा नगर पालिकेचा परवाना काढलेला असावा.
परवान्याच्या अर्जासोबत तहसीलदारांचे रहिवाशी प्रमाणपत्रानुसार अर्जदार त्या पत्त्यावर राहत असल्याच्या पुराव्याची खातरजमा झालेली असावी. अर्जदाराकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे. तसेच दुकानाच्या जागेचा नकाशाची प्रत असावी. व्यवसाय कर अधिकारी, व्यवसाय कर कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र असावे. परवान्यात नमूद अटींचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असून, विहित मुदतीतच अर्ज करावेत. फटाके विक्रेत्याने ते विक्री करताना त्या फटाक्यांची आवाजाची तीव्रता १२५ डेसीबलपेक्षा जास्त नसावी तसेच बेरियम सॉल्टयुक्त व त्या प्रकारचे फटाक्यांची साठवणूक किंवा विक्री करू नयेत, असेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.....
*****
0 टिप्पण्या