🌟असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले आहे🌟
परभणी (दि.20 ऑक्टोंबर) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनांचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झाले असून, अर्जदारांना 50 लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज वाटप करता येते. त्यामुळे पात्र व गरजूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले आहे.
परभणी जिल्ह्यातील मातंग समाजातील अंतर्भाव असलेल्या 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदारांनी थेट कर्ज योजनेंतर्गत अर्ज करावेत. त्यासाठी अर्जदार हा जिल्ह्यातील मांग- मातंग समाजातील व 18 वर्षे पूर्ण व 50 वर्षापेक्षा जास्त असू नये. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तसेच त्याने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत महामंडळाच्या कार्यालयात जमा करावेत. अर्जदाराने स्वत: मूळ कागदपत्रासह अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार, पॅन कार्डची छायांकित प्रत, दोन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, (नमुना नं 08, वीज देयक व करभरणा, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप अॅक्ट परवाना, व्यवसायासंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला,अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र,अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा, प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्व साक्षांकित असावीत. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) परभणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, येथे स्विकारले जातील, असे प्रसद्धिीपत्रकाद्वारे कळविले आहे.....
*****
0 टिप्पण्या