🌟भारतात प्रथम दूरदर्शन सेवा आरंभ दिवस : प्रारंभी अनेकांचा विरोध: नंतर मात्र आनंदी आनंद...!


🌟दूरदर्शवरून पहिले प्रसारण दि.१५ सप्टेंबर १९५९ रोजी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवनात करण्यात आले 🌟

दूरदर्शन हे भारताचे एक प्रथम टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन मनोरंजनपर कार्यक्रम प्रसारित करते. दूरदर्शन हे प्रसार भारती या भारत सरकारच्या संस्थेद्वारे चालवले जाते. आपल्या भारत देशामध्ये दूरदर्शवरून पहिले प्रसारण दि.१५ सप्टेंबर १९५९ रोजी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले. आज प्रसार भारती या संस्थेच्या अखत्यारीत असलेले दूरदर्शन त्यावेळी ऑल इंडिया रेडिओचाच एक भाग होता. सन १९७२ साली दूरदर्शनचे मुंबई केंद्र सुरू झाले. ही ज्ञानवर्धक माहिती वाचा अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या या लेखातून... संपादक.

     दूरदर्शन भारतातील पहिले चॅनल आहे. दूरदर्शन मोफत आहे. ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून दूरदर्शनवर नियमित दैनिक प्रसारणांची सुरुवात सन १९६५मध्ये करण्यात आली. सन १९७५पर्यंत भारतातील फक्त सात शहरांमध्ये टीव्ही सेवा होती आणि दूरदर्शन ही भारतातील टीव्ही सेवा देणारी एकमेव कंपनी होती. जी आज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. सन १९८५नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खाऊन जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, दी वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षकवर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते.

    भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक नेटर्वक- जाळे आहे. डीडी-१ या वाहिनीचे एक हजार बेचाळीस प्रादेशिक ट्रान्समिटर्सपर्यंत जाळे पसरले आहे. देशात ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१चे कार्यक्रम पोहेचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समिटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रह- इन्सॅटवर अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे. देशात ४९ शहरांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती केंद्र कार्यरत आहेत. दूरदर्शवरून पहिले प्रसारण दि.१५ सप्टेंबर १९५९ रोजी नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले. आज प्रसार भारती या संस्थेच्या अखत्यारीत असलेले दूरदर्शन त्यावेळी ऑल इंडिया रेडिओचाच एक भाग होता. सन १९७२ साली दूरदर्शनचे मुंबई केंद्र सुरू झाले. पहिली काही वर्ष महाराष्ट्रात मुंबई-पुण्यातच कार्यक्रम दिसत. त्याचा पसारा खऱ्या अर्थाने वाढला तो सन १९८२ साली देशात झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धांमुळे..!! तेव्हा दूरदर्शन खेड्यापाड्यात पोचले. सुरुवातीला या माध्यमाला अनेकांनी विरोध केला. लोकांना टीव्हीची नाही तर भाकरीची गरज आहे, असे म्हणणारे पुष्कळ होते. पण गमंतीची गोष्ट अशी, की लोकांनीच हे म्हणणे खोटे पाडले. ज्या खेड्यांत वीज नव्हती, तेथे ती आल्यावर अनेकांनी पहिल्यांदा दूरदर्शन संच विकत घेतले होते. दूरचित्रवाणीचा म्हणावा तसा प्रसार सन १९६५पर्यंत झाला नाही. त्या वर्षापासून केंद्र सरकारने दूरचित्रवाणीचे जाळे देशात प्रसृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हँबर्गहून सहा तज्ञांचे एक मंडळ भारतात आले आणि त्यांनी पहिले आधुनिक दूरचित्रवाणी कलामंदिर भारताच्या राजधानीत उभारले. त्यानुसार सु.दोन हजार दूरचित्रवाणी संचांना एकाच वेळी दूरदर्शनाचा लाभ होईल आणि त्याचे क्षेत्र ४० किमी असेल, अशी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली. याच साली केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवणी खात्याने डॉ.एस्.भगवंतम् यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रवाणी विकास, प्रसार, नवीन पद्धती व तंत्र यांच्या अभ्यासासाठी एक समिती नेमली. या समितीने आपला अहवाल सादर करून सबंध देशभर उच्च दर्जाचे दूरदर्शन कार्यक्रम दिसावेत, म्हणून तेरा परिवाह योजनेचा विकास- थर्थींन चॅनेल प्लॅन यावर भर देण्याची व दूरचित्रवाणीच्या स्वायत्त निगमासंबंधीची शिफारस केली. त्यानंतर डॉ.अशोक के.चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने सन १९६४मध्ये नेमलेल्या दुसऱ्या समितीने आपला अहवाल सन १९६६मध्ये केंद्र सरकारकडे सादर केला. त्या समितीने नभोवाणी व दूरचित्रवाणी या दोहोंसाठी दोन स्वायत्त निगम निर्माण करण्याची शिफारस केली. तसेच निरक्षरता घालविण्याचे व शिक्षणप्रसाराचे एक प्रभावी साधन म्हणून दूरचित्रवाणीचा सर्व देशभर पुढील दहा वर्षांत झपाट्याने प्रसार करण्यात यावा, असे सुचविले. सरकारने या दोन समित्यांच्या काही मौलिक सूचना मान्य केल्या. तथापि दोन स्वायत्त निगम स्थापण्याची शिफारस स्वीकारली नाही.

      दूरदर्शनवरून बातमीपत्राची नियमित सेवा सन १९६५पासून सुरू झाली. सन १९७२मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. तीन वर्षांनी चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला गेला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंटची चाचणी सन १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. सन १९८२मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फत प्रसारण सुरू करण्यात आले. या बरोबरच राष्ट्रीय प्रसारणास सुरुवात झाली. रंगीत दूरदर्शनचे युगही याचवेळी सुरू झाले. सन १९८२मध्ये दूरदर्शन राष्ट्रीय प्रसारक म्हणून अस्तित्वात आले. पूर्वी खाजगी टीव्ही वाहिन्या नव्हत्या, त्यामुळे दूरदर्शन ही एकमेव वहिनी होती. त्यावरील कार्यक्रम खुप लोकप्रिय झाले. जसे की सन १९८७मध्ये रामायण, महाभारत, शक्तिमान, श्रीमान श्रीमती आदी शृंखलांनी तर लोकांना अक्षरशः वेडावून सोडले होते. दूरदर्शन संस्थेची उद्दिष्टे आकाशवाणीच्या उद्दिष्टांप्रमाणेच आहेत- देशी, विदेशी बातम्यांचे संकलन करून बातमीपत्रे प्रक्षेपित करणे. देशाचा योजनाबद्ध सर्वांगीण विकास कसा होईल, याबद्दलचे विचार व माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे प्रत्यक्ष शैक्षणिक धडे, कृषिविषयक प्रात्यक्षिके इत्यादींद्वारे कृषिशिक्षण देणे, कुटुंबनियोजन व तत्संबंधीची माहिती देणे, मनोरंजन करणे वगैरे विविध स्वरूपाची उद्दिष्टे आहेत. मनोरंजन व माहितीकरीता नभोनाट्य, देशी अथवा विदेशी चित्रपट, संगीताचे बहुविध कार्यक्रम, चर्चासत्रे, व्याख्याने वगैरे कार्यक्रम ठेवण्यात येतात. दूरदर्शन ही दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची एक संस्था आहे. माहिती व नभाेवाणी खात्यापासून स्वतंत्ररीत्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम संयोजित करण्यासाठी दूरदर्शन ही संस्था दि.१ एप्रिल १९७६ राेजी स्थापन करण्यात आली. भारतात दूरचित्रवाणीचा विकास सन १९६०नंतरच विशेषत्वाने घडून आला. दि.१५ सप्टेंबर १९५९मध्ये पहिले दूरचित्रवाणी केंद्र यूनेस्कोच्या मदतीने प्रायोगिक स्तरांवर दिल्ली येथे सुरू करण्यात आले. प्रथम त्याचे स्वरूप एक मार्गदर्शी दूरचित्रवाणी प्रकल्प असे होते आणि त्यावरून आठवड्यातून फक्त शैक्षणिक कार्यक्रम होत. हळूहळू ते सर्वांगांनी परिपूर्ण करण्यात आले. फोर्ड प्रतिष्ठानातर्फे शैक्षणिक दूरचित्रवाणीचा भारतात कसा प्रसार होईल? हे पाहण्याकरिता एक मंडळ सन १९६० साली आले. मंडळाने दिल्ली दूरचित्रवाणी व तिचा परिसर यांचा अभ्यास करून भारतातील शैक्षणिक दूरचित्रवाणीकरिता एक आराखडा तयार करून दिला. त्याप्रमाणे माध्यमिक शाळांत नियमित शालेय पाठांचे कार्यक्रम दाखविण्यात येऊ लागले.     

!! दूरदर्शन सेवारंभ दिनाच्या सर्व टिव्हीप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी 

गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३

     

                          .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या