🌟परभणी जिल्ह्यातील अनेक विकासकामांना भरघोस निधी घोषित🌟
परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३) : मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळानंतर ते बोलत होते. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक विकासकामांना भरघोस निधी घोषित केल्यामुळे चालना मिळणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशूसंर्वधन आदी विभागांशी निगड़ीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ९१.८०कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आला असून, त्यामुळे येथील विकासकामांचा चालना मिळणार आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असल्यामुळे येथील स्वातंत्रसेनानीच्या गावातील शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून विकसित करणार असल्याचेही मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले. मराठवाड्यातील एकूण ७६ तालुक्यांतून शाळा निवडणार असून, विविध सुविधांसाठी ९५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाने सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पाला ७२८ कोटी आणि ममदापूर उच्च पातळी बंधारा बांधकामासाठी २७१ कोटी रुपयांचा भरघोस निधी देण्याची घोषणा केली आहे.
राज्यात बालविवाहात प्रथम क्रमांकावर असलेल्या परभणी जिल्ह्यातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी मोठे पाऊल उचलेले आहे. जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरु करणार असल्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण ४०० मुलींना शिक्षण घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने २०.७३ कोटी रुपये खर्चाची तजवीज केली आहे.
युवकांनी खेळाकडे लक्ष देत राज्य आणि देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवावा, यासाठी परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा मंजूर केली असून त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आला आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरणासाठी १५ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.
मराठवाड्यातील सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी येथील विविध स्मारके, प्रसिद्ध मंदिरांचा विकास करण्यात येणार आहे. जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर, धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिरासह चारठाणा मंदिर समूहाचे संवर्धन आणि विकास करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. मराठवाड्यातील पुरातन मंदिरांच्या विकासकामांसाठी तब्बल २५३ कोटी ७० लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
परभणी शहराची वाढती लोकसंख्या पाहता, शहराची तहान वाढली असून, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाकडून समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येईल. त्यासाठी १५७.११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परभणी शहरासाठी ४०८.८३ कोटी रुपये किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प मंजूर करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परभणी महानगरपालिकेस नटराज रंग मंदिराच्या बांधकामासाठी ११.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असून, गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधार बांधकामासाठी निधीचा पुरवठा करण्यात येणार आहे.....
0 टिप्पण्या