🌟नांदेड शहर स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


🌟17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन🌟

🌟शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर🌟

नांदेड (दि.15 सप्टेंबर 2023) :- माझे शहर सुंदर शहर या संकल्पनेला कृतीत उतरविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घर व प‍रिसरापासून स्वच्छतेला सुरवात करावी. प्रत्येकाने फक्त पंधरवडयापुरतेच नव्हे तर स्वच्छतेची कायमस्वरुपी सवय लावून घेतली पाहिजे. स्वच्छतेची ही चळवळ जनमाणसात लोकचळवळ निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने आपण कचरामुक्त शहर करण्याकडे वाटचाल करण्यात यशस्वी होवू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार तथा नागरी कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे, स्वारातीम विद्यापीठाचे संचालक डॉ. मल्लिकार्जून करजगी, नागरी कृती समितीचे डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक सिध्देवाड, मनपाचे उपायुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, कापड मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्व एनजीओचे अध्यक्ष, किराणा, हॉटेल, लायन्स क्लब, अडत व्यापारी, बार परमिट असोसिएशनचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहिम शहरात यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन सर्वाच्या सहभागातून करावे. त्यादृष्टीने उपाययोजना आखण्यात येतील. या मोहिमेचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या स्वच्छता पंधवाडयात स्थानिक नागरिक, मनपा, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी विविध प्रभागनिहाय दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात यावा.

या मोहिमे दरम्यान शालेय विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढून त्यांच्या हातात स्वच्छतेबाबत घोषणा फलक देवून जनजागृती करण्यावर भर द्यावा असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयात प्लास्टिक संकलन टँक तयार करण्यात यावेत, त्यामुळे अनावश्यक प्लॉस्टिक संकलन होवून रस्त्यावरील कचरा कमी होण्यास मदत होईल. तसेच मनपाने शहर स्वच्छतेकडे, कचरा संकलन करण्याच्या वेळा, मनपा कर्मचाऱ्यांचा कचरा संकलनातील सहभाग, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता याबाबतच्या उपाययोजना करण्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी सूचना दिल्या.

जिल्हा कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली टिम तयार करून प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबवावी. घंटागाडी व स्वच्छतेच्या वेळेत मनपाने बदल करुन घ्यावेत. शहरातील मुख्य रस्ता, सार्वजनिक ठिकाणे, नदिचा काठ, बाजाराची मुख्य ठिकाणे स्वच्छ होतील याबाबत उपाययोजनाबाबत नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे मांडल्या. तसेच सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांनी मार्केटमधील कचरा निर्मुलनासाठी आवश्यक त्या उपाययोजना स्वत: च्या पुढाकारातून करण्याबाबत सकारात्मका दर्शविली. स्वच्छतेबाबत ज्या काही उपाययोजना करता येईल त्यात पुढाकार घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या