🌟अकोला-वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमी रस्त्याचे राष्ट्रार्पण🌟
🌟सिंचनविषयक व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशन कंत्राटदारांचा सत्कार🌟
फुलचंद भगत
वाशिम:- जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.जिल्ह्यातून जाणारा पूर्वी एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता आज 228 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम आज पूर्ण झाले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाचा कार्यभार पूर्ण झालेला असेल तेव्हा जिल्ह्यात एकूण 10 हजार कोटी रुपयांची राजमार्गाची कामे पूर्ण होतील. जिल्ह्यातून 12 ते 13 नद्यांचा उगम आहे. ते पाणी बाहेर जिल्ह्यात वाहून जाते.त्यामुळे सिंचन क्षेत्र कमी आहे.मात्र जिल्ह्यात व्हीजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे.त्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय आणि उद्योगाला चालना देण्यात येईल.असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आज 29 सप्टेंबर रोजी वाशीम येथील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित कार्यक्रमात अकोला ते वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या चारपदरी महामार्गाच्या कामावर 3694 कोटी 51 लक्ष रुपये खर्च करण्यात आले.या राष्ट्रीय महामार्गाचे राष्ट्रार्पण यावेळी श्री.गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री वसंत खंडेलवाल, लखन मलिक, राजेंद्र पाटणी,अमित झनक, हिंगोलीचे आमदार तानाजी मुरकुटे,माजी खासदार अनंतराव देशमुख,माजी आमदार ऍड. विजयराव जाधव,पुरुषोत्तम राजगुरू जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्याम बडे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
शेलुबाजार वळण रस्त्याचे लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले,या रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेची कामे करण्यात आली आहे. आज विदर्भाचे चित्र बदलत आहे.बरीच विकास कामे होत आहे.गेल्या काही वर्षात नापिकीमुळे मोठ्या प्रमाणात विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील वाशिम व गडचिरोली हे जिल्हे आकांक्षीत जिल्हे म्हणून केंद्र सरकारने निवडले आहे. जिल्ह्याचे हे चित्र बदलविण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच जिल्ह्याचे चित्र बदलण्यासाठी त्यांनी हातभार लावावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी भविष्यात विमानासाठी इंधन निर्मिती केली पाहिजे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले,तंत्रज्ञान बदलले आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या खासदारांना सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. दिव्यांग्यांना विविध आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.कोणतीही वस्तू मोफत न देता त्याची काहीतरी किंमत ठेवले तर त्याचे महत्त्व असते.सिटीस्कॅन, एमआरआय,तसेच पॅथॉलॉजीच्या चाचण्यासुद्धा अल्प दरात रुग्णांच्या करून देण्यात येत आहे.कोरोना काळात दहा दिवसात 100 ट्रक ऑक्सिजन विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांना कोरोनाच्या काळात उपलब्ध करून दिला.त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.या काळात पाचशे व्हेंटिलेटर प्रति व्हेंटिलेटर केवळ 47 हजार रुपयात उपलब्ध करून दिले. शेतकरी आज आत्महत्या करतो आहे. बेरोजगारांना काम नाही राजकारण हे सेवाकारण झाले पाहिजे.असे ते यावेळी म्हणाले.
नवीन व्हिजन ठेवून काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून श्री गडकरी म्हणाले,विदर्भातून 22 कंटेनर भाजीपाला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात पोहोचविण्यात आला. खारपाण पट्ट्यात पाणी गोडे करण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करून खार आणि गोड्या पाण्यातील झिंग्यांचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.एकरी 30 लाख रुपये झिंग्याचे उत्पन्न घेता येणार आहे. उद्योग व्यवसाय सुरू करावे.गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच उपयोगात आले पाहिजे. 47 निकषांवर जिल्हा मागास असल्याने आकांक्षीत जिल्हा म्हणून जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. पाण्याच्या उपलब्धतेतून सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. वनक्षेत्रात जलसंधारण व वन्यप्राणी शेतात येणार नाही व शेतीचे नुकसान करणार नाही यासाठी वन्य प्राण्यांना वनतळ्यात पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी त्यांना सहन करण्यात येणार आहे.वैनगंगा नदीवरील सर्व 12 बॅरेजच्या कामांची किंमत जवळपास 3000 कोटी रुपये आहे.डीपीडीसी मधून या जलसुधारणाची कामे झाली तर 718 हेक्टर सिंचनाची व्यवस्था निर्माण होईल.असे ते म्हणाले.
पाण्याची सुविधा झाली तर अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मार्गी लागतील असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे.एक साखर कारखाना जिल्ह्यात सुरू झाला तर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे चित्र बदलण्यास मदत होईल. बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. बालाजी कारखाना सुरू करण्यास निश्चित मदत करण्यात येईल.असे त्यांनी यावेळी आश्वस्थ केले.
पाण्याची उपलब्धता असल्यास ऊस लागवड करावी असे शेतकऱ्यांना आवाहन करून श्री. गडकरी म्हणाले,शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होईल.येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस नागपूरवरून शेगावसाठी सुरू केली आहे. शेगावसाठी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक या बसमधून प्रवास करत आहे. आतापर्यंत 88 हजार या लोकांनी त्याचा लाभ घेतल्याची
माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रत्येक परिवाराला घर चांगले असले पाहिजे,शेतकऱ्यांना चांगली सुविधा निर्माण झाली पाहिजे, कोणतीही गोष्ट अशक्य नाही.खोटे आश्वासन आजपर्यंत 40 वर्षात आपण दिले नसल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले,आगामी निवडणुकीत आपण कोणतेही पोस्टर,बॅनर व पैसा कुठल्याही मतदाराला देणार नाही. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने शासनाला सर्वात जास्त जीएसटी उपलब्ध करून दिला आहे. गरिबांची सेवा करून गावे समृद्ध झाली पाहिजे.शेतकरी समृद्ध झाला पाहिजे.वाशिम रेल्वे स्टेशनला लॉजिस्टिक पार्क विकसित करणार असल्याचे सांगून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.काम करण्यासाठी लोकांचे निस्वार्थ प्रेम देशात मिळाले.अशा कामातून लोकांचा विश्वास वाढतो.दहा वर्षात 4500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्याच्या विकासाला सिंचन व्यवस्था निर्माण करून गती मिळणार आहे.रस्ते विकासातून जिल्ह्याचे चित्र बदलले आहे.गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही.वाशिम शहरातील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यात येईल. त्यासाठी वाशिम शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मदत मदत करावी असे म्हणाले.
खासदार भावना गवळी म्हणाल्या,गडकरी साहेबांचे नियोजन व कार्यकुशलतेमुळे रस्त्यांचे देशभर जाळे विणले गेले आहे.गडकरी साहेबांचे आभार मानावे तेवढे कमी आहे.नवनवीन उपक्रम देशासाठी कसे आणता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.जिल्ह्यात 71 टक्के पाण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तलावातून गाळ काढून तलावांचे खोलीकरण करावे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होईल. अकोला नाका ते पुसद नाका हा रस्ता चार पदरी लवकरच होणार आहे. जिल्ह्यातील बंद असलेला साखर कारखाना नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन सुरू करावा.वाशिम हिंगोली दरम्यानचा वाशीम येथील उड्डाणपूल तीन महिन्यात सुरू होईल. तसेच त्याचे सर्विस रस्ते सुद्धा सुरू होतील.शिवनी येथील सदोष पूल दुरुस्त करावा असे त्या म्हणाल्या.
आमदार आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले,अमरावती - वाशिम रस्ता,मालेगाव ते सेनगाव रस्त्याचे देखील यावेळी लोकार्पण करण्यात आले आहे.शहरातून जाणारा मार्ग सहापदरी करावा कनेरगाव येथील आरओबीचे काम तात्काळ झाले पाहिजे.जिल्ह्याच्या रस्त्यांचा अनुशेष गडकरी साहेबांनी दूर केला असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्ह्याच्या रस्ते विकासाला गती मिळाली आहे असे सांगून खासदार गवळी म्हणाल्या,जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प गडकरी साहेबांनी आणावा.त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.असे त्या म्हणाल्या.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योजक गुंतवणूक करतील अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.पाटणी म्हणाले,जिल्हा सिंचनात मागे होता. गडकरी साहेबांनी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.जिल्ह्यात 12 ते 14 नद्यांचा उगम असल्यामुळे बाहेर जिल्ह्यात सिंचन प्रकल्प आहे.असे म्हणाले.
आमदार मलिक म्हणाले, वाशिम मतदारसंघातील सर्व रस्ते चांगले आहेत.त्याबद्दल गडकरी साहेबांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी या राष्ट्रीय महामार्गाचे तीन टप्प्यात काम करणारे कंत्राटदार राजेश सोनी, पी. रवी पटनायक, पवनकुमार,मनीष गांधी व राजेश फीचर यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पी व्ही.पाटील आणि जिल्ह्यात जलसिंचन क्षेत्रात काम करणारे मंगरूळपीर येथील जलविषयक अभ्यासक सचिन कुलकर्णी यांनी तयार केलेल्या जलसिंचन विषयक व्हिजन डॉक्युमेंटचे श्री.गडकरी यांनी प्रकाशन केले.जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले.उपस्थितांचे आभार राजमार्गचे कार्यकारी अभियंता राकेश जवादे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील,अकोला व हिंगोली जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या