🌟लोकांनी कर्णबधिरांनादेखील आपलेच मानले पाहिजे आणि त्यांचे समाजातील महत्त्व समजले पाहिजे : डॉ.संतोष मुंडे


🌟परळी वैजनाथमध्ये भावनांनी ओथंबून वाहिलेला जागतिक सांकेतिक दिन साजरा🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- परळी वैजनाथ तालुका कर्णबधिर युवा मंडळाच्यावतीने सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी जागतिक सांकेतिक भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या भावना सामन्य माणसाला व्यक्त बोलून करता येत नाही ते कर्णबधिर बंधू भगिनी सांकेतिक भाषेद्वारे व्यक्त होतात. आज परळी वैजनाथमध्ये भावनांनी ओथंबून वाहिलेला जागतिक सांकेतिक दिन साजरा झाला. लोकांनी कर्णबधिरांनादेखील आपलेच मानले पाहिजे आणि त्यांचे समाजातील महत्त्व समजले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. संतोष मुंडेंनी केले.छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना वंदन करून तसेच हवेत फुगे सोडून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली शिवाजी महाराज चौकातून मोंढा मार्केटमार्गे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर अशी पोहचली.


 यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे म्हणाले की 'दरवर्षी २३ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांना सांकेतिक भाषेचे महत्त्व पटवून देणे हा आहे. मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषा खूप महत्त्वाची आहे. यामध्ये बोटांनी किंवा हाताच्या इशाऱ्यांद्वारे संभाषण केले जाते. जे लोक बोलू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी सांकेतिक भाषा खूप महत्त्वाची आहे. यामध्ये देहबोलीतून व्यक्तीशी संवाद साधला जातो. या हावभावाला सांकेतिक भाषा म्हणतात.'


* आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषेचा इतिहास :-


२३ सप्टेंबर २०१८ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने प्रथमच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषांचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. २०१८ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला. हा दिवस कर्णबधिरांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो असेही डॉ. संतोष मुंडे म्हणाले.

लोकांना सांकेतिक भाषेची जाणीव झाली पाहिजे आणि तिचे महत्त्व समजले पाहिजे, या उद्देशाने दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्याद्वारे कर्णबधिरांना नवीन गोष्टींची माहिती मिळते. कर्णबधिर लोक चिन्हांच्या मदतीने कोणाशीही आणि कुठेही संवाद साधू शकतात. एका अहवालानुसार, जगभरात ७० दशलक्षाहून अधिक लोक बहिरे आहेत अशी माहिती डॉ.संतोष मुंडेंनी आपल्या भाषणात दिली.


यावेळी परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुजाहेद शेख, कर्णबधिर संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष श्रीमती निलम मनोज पटवारी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे तर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अब्दुल हाई, उपाध्यक्ष व्यंकटेश देशमुख, सचिव संजय होनराव, कोषाध्यक्ष उत्तम राठोड, सल्लागार श्रीमती शारदा देशमुख,  माजी सरपंच पद्माकर शिंदे, हरिष नागरगोजे, बबन कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात संपन्न झालेल्या  कार्यक्रमास मोठय़ा संख्येने कर्णबधिर बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परळी तालुका कर्णबधिर युवा मंडळाचे अध्यक्ष दिपक फड, उपाध्यक्ष अर्जुन जगताप, सचिव राम शेप, कोषाध्यक्ष अविनाश फड, सदस्य शकील पठाण, साईप्रसाद किवले, महिला सदस्या श्रीमती मनि‌षा शेप, रेणुका राठोड आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या