🌟स्वातंत्र्यसैनिक स्व.सुर्यभानजी पवार अण्णांनी नेहमीच देश सेवेसोबत समाजहिताचेही खूप कार्य केले🌟
✍🏻लेखक : प्रा.डॉ.संजय कसाब पुर्णा
१९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि अनेक संस्थाने अखंड भारत देशात समाविष्ट झाले पण हैदराबाद संस्थान भारत देशात एकरुप होत नव्हते. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा भूप्रदेश मात्र निजाम राजवटीत असल्यामुळे या प्रदेशातील जनता निझामाच्या जुलमी कायदयामुळे त्रासून भयग्रस्त झाली होती. निजाम आपले हैद्राबाद संस्थान अखंड भारत देशात समाविष्ट करण्यास तयार होत नव्हता. तर मराठवाड्यातील जनता निजाम राजवटीतून मुक्त होऊन अखंड भारत देशात समाविष्ट होण्यास आतुर झाली होती. संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पेटले होते. गावोगावी सभा,बैठका, गटचर्चा, मेळावे घेऊन निझाम राजवट उध्वस्त करण्याचा सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनी चंगच बांधला होता.
अशा परिस्थितीत परभणी जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीतील अनेक कार्यकर्ते माराठवाडा मुक्ती आंदोलनासाठी एकत्र येऊन निजामशाहीच्या विरोधात बंड करण्यास तयार झाले होते.संबंध मराठवाडा पेटून उठल्यामुळे गावोगावी कार्यकर्ते संघर्षाची तयारी करु लागले. परभणी जिल्ह्यातील विनायकराव चारठाणकर,मा.खासदार देवराव कांबळे पाथ्रीकर, प्रभाकर वाईकर, सोनाजी उफाडे,बहिर्जी शिंदें, विश्या विठ्या, लक्ष्मण राठोड,आनंदा राठोड, केशवराव डावरे, गुणाजी भालेराव, नारायण जयराम, नारायण खारकर असे शेकडो तरुण कार्यकर्ते जिल्हाभरातून एकत्र येऊ लागले. गावागावात तुकड्या तयार होऊ लागल्या. परभणी तालुक्यातील वझुर (बु.) चे ही सात-आठ मुलं कोंडबाराव खुणे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी झाले होते . यांच्या सोबतच शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक लढवय्या तरुण देशभक्तीने भारावून गेला होता.वयाच्या अवघ्या बावीस तेवीसव्या वर्षी ऐन तारुण्यात देशासाठी घरदार सोडून आंदोलनासाठी तयार झाला. मरण तळहातावर घेऊन जीवाची पर्वा न करता मराठवाडा मुक्ती आंदोलनासाठी घराबाहेर पडला. तो लढवय्या तरुण मुलगा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी सिताराम पवार होत.
मराठवाडा मुक्तीसंग्रामात मिळवलेल्या विजयाचा आनंद आम्हाला ते नेहमी फार उत्साहाने सांगायचे.सूर्यभानजी अण्णांनी आम्हाला तर चकमकीच्या अनेक घटना भरभरून वर्णन करून सांगितलेल्या आहेत.बोल्डा येथील घटना, उमरी प्रकरण, हदगावची घटना, रोहिल्यासोबत झालेल्या चकमकी, संघर्षात बंदुकीचा केलेला वापर, गंगाखेडचा पुल पाडण्याचा फसलेला प्रयोग,रात्री-बेरात्री भूमीगत कसे राहिलोत, गावकरी आम्हाला अंधारात येऊन कशा भाकरी पुरवायचे, गुप्त वार्ता कशा घेऊन यायचे, हे वर्णन अण्णा जेव्हा सांगायचे तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे यायचे.
१९४८ साली निझामाच्या जुलमी सतेतून मराठवाडा मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील लोकांनी किती आनंदाने साजरा केला होता याचे वर्णन तर अण्णा खूपच उल्हासाने सांगायचे. आज अमृत महोत्सवी वर्षानंतरही मराठवाडय़ातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येते तेव्हा मात्र फार दु:ख होते. अनेक गावांमध्ये रोहिल्यासोबत झालेल्या संघर्षात अक्षरशः कितेक रोहिले मारले गेले तर काही गावात चांगल्या मुस्लिमांना गावकऱ्यांनी लपवून ठेवले आणि त्यांचे जीव वाचविले.
हे मराठवाड्यातील माणुसकीचे दर्शनही अण्णा आवर्जून सांगायचे.पण हे प्रमाण खूप कमी होते. अण्णांनी नेहमीच देश सेवेसोबत समाजहिताचेही खूप कार्य केले स्वतःच्या कुटुंबांतील मुलांना उच्च शिक्षण देऊन उच्च पदस्थ बनविले. गावातील अनेक लोकांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले त्यामुळे आज प्राध्यापक,डॉक्टर, इंजिनिअर,तहसीलदार,बँक अधिकारी, पोलिस अधिकारी विविध क्षेत्रात गावातील मुले सेवा देत आहेत.त्यांच्या प्रेरणेमुळे आज वझुर गावातील व परिसरातील मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहेत.
आपल्या तालुक्यातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या मूलां- मुलींना उच्च शिक्षण मिळावे म्हणून अण्णाच्या नावाने पूर्णा(जं.) येथे एका महाविद्यालयाची स्थापना केली आहे.आज पूर्णा (जं.) येथे स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातील शेकडो मुलं-मुली उच्च-शिक्षण घेत आहेत.अण्णा स्वतः माळकरी असल्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाची पंरपरा शेवटपर्यंत जपली. सतत आनंदी आणि हसतमुख असणारे अण्णा नेहमी सकारात्मक वृत्तीने जगले. गावातील गोरगरीब मुलां व मुलींना ग्रंथ वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गावात ग्रंथालय असावं हे त्यांचे स्वप्न होते. अण्णांच्या प्रेरणेमुळे गावात " अनुसया सार्वजनिक ग्रंथालय, वझुर बु." हे 'अ ' दर्जाचे सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. अण्णांच्या नावानेही पूर्णा येथे स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार सार्वजनिक वाचनालय आहे. स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार अण्णा हे तालुक्यातील लढवय्ये, समाजशील आणि झुंजार स्वातंत्र्य सैनिक होते. अण्णांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात दिलेले योगदान आणि त्यांचे कार्य जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. अण्णाचे विचार आणि कार्य हे सतत मराठवाड्यासाठी प्रेरणादायी राहाणारे असून मराठवाडा मुक्ती आंदोलनाच्या इतिहासात या लढवय्या शेतकरी पुत्राचे कार्य महत्वपूर्ण राहिले आहे.अशा थोर शेतकरी पुत्र असलेल्या स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या देशभक्तीला आणि कार्याला मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन.
प्रा.डॉ.संजय कसाब.
0 टिप्पण्या