🌟सार्वजनिक ग्रंथालयाकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पहावे - डॉ.धर्मराज वीर


🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात शिक्षक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते🌟


पुर्णा (दि.०६ सप्टेंबर २०२३) प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाकडे सकारात्मक भावनेने पाहून त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी जरूर उपाययोजना कराव्यात मात्र चांगले चालणारे ग्रंथालय टिकवून नवीन ग्रंथालयांना अनुदान देऊन समाज हिताचे कार्य म्हणून गाव तिथे ग्रंथालय चळवळीस प्रोत्साहन द्यावे. असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील ज्ञानस्त्रोत केंद्राचे सेवानिवृत्त संचालक डॉ.धर्मराज वीर यांनी केले. 

ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय आणि परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाचे औचित्य साधून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या ग्रंथालय व माहिती शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार हे होते. पुढे बोलताना डॉ. धर्मराज वीर म्हणाले की ग्रामीण भागातील सार्वजनिक ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना व नागरिकांना सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करुन ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करावी. तसेच प्रमाणिक कार्य करून आपली सेवा सिद्ध करावी. असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

 यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी  आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की ग्रंथालये आणि ग्रंथपाल हे खऱ्या अर्थाने वाचकांना ग्रंथाची गोडी निर्माण करण्याचे काम करतात म्हणून ग्रंथपालांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वाचक वाढवले पाहिजेत. तरच ग्रंथालय चळवळीला बळ मिळेल अधिसभा सदस्य डॉ.विष्णू पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले  की ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते तशीच बुध्दीला ज्ञानाची गरज असते म्हणून ग्रंथालये ही समाजाच्या बौध्दीक वाढीसाठी महत्वाचे असतात. 

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, आशिष ढोक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत यापुढे  सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असून सर्व तपासण्या आणि अहवाल पेपरलेस पद्धतीने होतील म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांनी आधुनिक संगणकीय पद्धतीचा वापर करून ग्रंथालये सक्षम करण्याचे आवाहन केले. तसेच या ठिकाणी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी समाधानकारक पध्दतीने दिले. सेवानिवृत्त शिक्षक तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर म्हणाले की, आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाची चळवळ गतिमान करण्यासाठी खूप वेळ दिला. आता आपण सर्वांनी ग्रंथालय चळवळीसाठी आपले योगदान दिले पाहिजे. सामाजिक उपक्रम व वाचकांची संख्या यावर लक्ष देऊन कार्य केले तर निश्चितच ग्रंथालय चळवळीची प्रगती होऊ शकते. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेखा भोसले यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच शिक्षक हा तत्पर व श्रमशील असतो म्हणून शिक्षकांनी प्रमाणिक प्रयत्न करून ज्ञान देण्याचे कार्य केले तर निश्चितच देशाला आणि समाजाला कुशल व समाजशील मनुष्यबळ मिळू शकते असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले.  मार्गदर्शन करताना  ते म्हणाले की शिक्षक हा सामाजिक मूल्याचे शिक्षण देत असतो. तो खऱ्या अर्थाने देश घडविण्याचे कार्य करतो म्हणून नवीन पिढी निर्माण होते. सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल सुद्धा शिक्षण देण्याचे कार्य करतात म्हणून ग्रंथपालाची जबाबदारी ओळखून     सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपालांनी सकारात्मक समाज घडविण्याचे कार्य करावे असे त्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सुजाता घन यांच्या स्वागत गीताने झाली या कार्यक्रमात सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांच्या प्रश्नावर चर्चा करून प्रश्नांची उत्तरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशीष ढोक यांनी सकारात्मक उत्तरे दिली या कार्यक्रमामध्ये महाविद्यालय व जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सचिवपदी जीवनराव लोंखडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्तीबद्दल  डॉ.धर्मराज वीर, भास्करराव पिंपळकर, डॉ. मधुकर गरड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार डॉ. विलास काळे यांनी मानले. 

या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल, सचिव, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्रीय विभाग प्रमुख डॉ. अशोक कोलंबीकर, ग्रंथपाल डॉ.विलास काळे, प्रा. मुनेश्वर, प्रा. दत्ता पवार विवीध समित्यांचे प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या