🌟अचूक उत्तरे देणाऱ्यांना चहासोबत आकर्षक बक्षीस दिले जाणार🌟
परभणी (दि.14 सप्टेंबर 2023) : मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातंर्गत बालविवाह विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने गत वर्षभरापासून सुरु केलेल्या ‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियानांतर्गत ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरात केले जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला व बाल विकास पुणेचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे तसेच महिला व बाल विकास औरंगाबादच्या विभागीय उपआयुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.
या अभियानाची सुरुवात गुरुवार (दि.14) पासून होत असून, वर्षभर जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, बसस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्राम, महिला व बालकांचे कायदे व योजना, बालविवाह मुक्त परभणी अभियान यावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. अचूक उत्तरे देणाऱ्यांना चहासोबत आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी बालविवाह मुक्त परभणी अभियानांतर्गत ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे....
0 टिप्पण्या