🌟मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दि.१४ सप्टेंबर २०२३ पासून कार्यक्रमांचा जागर....!


🌟परभणी शहरवासीयांना विविध कार्यक्रमांची मेजवानी🌟 

परभणी (दि.१३ सप्टेंबर २०२३) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उद्या गुरुवार, (दि. १४) पासून पुढील चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या समन्वयातून उद्या गुरुवार, दि. १४  रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी व हौशी गटाची चित्रकला स्पर्धा कल्याण सभामंडपम, जायकवाडी वसाहत येथे आयोजित केली आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशन येथे ‘स्पर्धा चाय पे चर्चा’ (मराठवाडा मुक्तिसंग्राम, बालविवाह व बालक कायदा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता कविसंमेलन व इतर कार्यक्रमांचे आयोजन बी. रघुनाथ सभागृह, शिवाजी पुतळ्याजवळ येथे करण्यात आले आहे. 

शुक्रवार, दि. १५ रोजी सकाळी मनपा, जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ६.३० वाजता एकता दौड आणि सायकल रॅली आयोजित केली असून, ही रॅली इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल - हुतात्मा स्मारक - राजगोपालचारी उद्यान, शिवाजी नगर या दरम्यान निघणार आहे.  सकाळी १० वाजता सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठवाडा मुक्तिलसंग्रामाच्या अनुषंगाने चलतचित्रणाचे (व्हिडीओ) सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता, बी. रघुनाथ सभागृहात मराठवाडा मुक्तिरसंग्रामाच्या अनुषंगाने प्रा. डॉ. महेश जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिाकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.शनिवार, दि. १६ रोजी सकाळी ६.३० वाजता इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल, हुतात्मा स्मारक - राजगोपालचारी उद्यानादरम्यान विद्यार्थ्यांची प्रभात फेरी असेल. या प्रभातफेरीमध्ये परभणी शहरातील सर्व मोठ्या शाळांचा सहभाग राहणार आहे. 

मराठवाडा मुक्तिवसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव दिनी रविवारी (दि.१७) राजगोपालचारी उद्यानात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या मुख्य कार्यक्रमानंतर येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. तर सायंकाळी ७ वाजता मराठवाड्याची लोकधारा व सांस्कृतिक कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होईल. यामध्ये गीतगायन, पोवाडा आणि भारुड आदींचा समावेश असेल. त्यामुळे मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

तत्पूर्वी १३ सप्टेंबरपासून राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सुरू झाली असून, ही स्पर्धा दोन गटात १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या गटात ६ ते १८ वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होतील. तर दुसरा गट १८ पासून पुढे राहणार असून, यामध्ये बालविवाह-एक सामाजिक कलंक, बालविवाह-बालकांच्या विकासातील अडथळा आणि मराठवाड्यातील बालविवाह कारणे व उपाययोजना या विषयांवर आधारित राहणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रम व स्पर्धेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या