🌟वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांचे आवाहन🌟
फुलचंद भगत
वाशिम:-दि.१९.०९.२३ रोजी पासून सुरु झालेला श्री गणेशोत्सव संपूर्ण जिल्ह्यात हर्षोल्हासात साजरा करण्यात येत असून आता श्री गणेशाला निरोप देण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण ७४८ गणेश मंडळांनि श्री गणेशाची स्थापना केली असून त्यामध्ये शहरी भागातील ३०९ श्री गणेश मंडळांनी तर ग्रामीण भागातील ४३९ श्री गणेश मंडळांनी सार्वजनिक श्री गणेशाची स्थापना केली. त्यापैकी एकूण २१४ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ या संकल्पने अंतर्गत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये जिल्हाभरातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळे दि.२८.०९.२०२३ रोजी ४१५ गणपती, दि.२९.०९.२०२३ रोजी २२० व दि.३०.०९.२०२३ रोजी ९० सार्वजनिक गणेश मंडळे सामुहिक मिरवणुका काढून श्रींचे थाटात विसर्जन करणार आहेत. श्रींच्या विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे.
श्री गणेश विसर्जन मिरवणूक पूर्वतयारी अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर व कारंजा तर अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांनी जऊळका, वाशिम ग्रामीण, वाशिम शहर येथे भेट देऊन शांतता सभा घेतल्या व विसर्जन मिरवणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला व विसर्जन मार्गांची पाहणी करून विसर्जन मार्गात असणारे खड्डे, नादुरुस्त वाहने, लोंबकळलेल्या विद्युत तारा/केबल इ. अडथळे बाबत संबंधितांना सूचना दिल्या. तीनही उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी यांनी आपापले हद्दीतील श्री गणेश मंडळांना भेटी दिल्या तसेच ग्रामभेटी घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता जिल्ह्यातील सर्व पो.स्टे.स्तरावर ठिकठिकाणी रूट मार्च पार पडले आहेत. श्री गणेश विसर्जन मार्गांचे ध्वनी पातळीचे नमुने घेण्यात आले असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी पातळीच्या मर्यादेबाबत ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) २००० मधील तरतुदींचे आणि मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे तंतोतंत पालन व्हावे तसेच लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध नागरिकांना DJ च्या आवाजाचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याबाबत श्री गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रत्येक हालचालीवर निगराणी ठेवण्याकरिता विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी CCTV कॅमेरा लावण्यात आले आहेत. संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान CCTV कॅमेरा/ड्रोन कॅमेरा द्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून मिरवणूका यशस्वीपणे पार पडाव्यात यासाठी जिल्हाभरातील जवळपास ३९८६ ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे.
श्री गणेश विसर्जन मिरवणूक निमित्त वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ०१ पोलीस अधीक्षक, ०१ अपर पोलीस अधीक्षक, ०४ पोलीस उपअधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ५५ सहा.पोलीस निरीक्षक, १० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, १२०० पोलीस अंमलदार, १५० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार, ०२ RCP व ०२ QRT पथक, ५७५ होमगार्ड, ०१ SRPF कंपनी इतका बंदोबस्त नेमण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणतीही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज असून नागरिकांनी आपातकालीन परिस्थितीत DIAL 112 वर संपर्क करावा.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या