🌟ईश्वरचंद्र विद्यासागर जयंती विशेष : बंगालच्या दयासागरास विनम्र अभिवादन.......!


🌟त्यांचा जन्म दि.२६ सप्टेंबर १८२० रोजी पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला🌟

      _ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळविले; पण ते सारे त्यांनी दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित ह्यांच्या साह्यार्थ खर्चिले. त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती. ते अज्ञेयवादी होते. देव, धर्म, अध्यात्म इत्यादींच्या गुंत्यात त्यांनी स्वतःला कधीच अडकवून घेतले नाही "मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो", असे ते म्हणत. हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीसपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला आणि त्यामुळे सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर म्हणूनच अधिक ओळखते. अधिक माहितीसाठी श्री कृ. गो. निकोडे गुरूजींचा सदर लेख आवर्जून वाचाच... संपादक

      बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म दि.२६ सप्टेंबर १८२० रोजी पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवतीदेवी असे होते. कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही उपाधी लावली होती; म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले. ते अठरा वर्षांचे असतानाच त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्‍न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयीदेवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षणखात्यात साध्या शिक्षकापासून ते शिक्षण निरीक्षकाच्या हुद्यापर्यंत काम केले. सरकारी शिक्षणखात्यात असताना त्यांनी ३५ नवीन बालिका विद्यालये उघडली. तसेच एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय व बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श- मॉडेल विद्यालये शिक्षणखात्यातर्फे स्थापना केली. संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राम्हणेतर विद्यार्थांना शिक्षण मिळत नसे; ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांस मुक्त प्रवेश दिला. सन १८५८ साली अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने शिक्षणखात्यातून ते बाहेर पडले. त्यापूर्वीच विधवांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष गेले होते. स्वतः संस्कृत पंडित असल्याने पराशर संहितेत विधवाविवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखविला. सन १८५६ साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. विद्यासागर स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींचे विवाह त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केले नाहीत. आपल्या मुलाचे लग्‍न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते. कुलीन ब्राम्हणवर्गातील बहुपत्‍नीकत्वाची चाल, मद्यपान इ. अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात. त्यांची भाषा सुबोध व सामान्य जनांना सहज समजेल अशी आहे. बंगाली भाषेच्या प्रकृतीला अनुरूप अशी गद्यशैली त्यांनी प्रचलित केली आणि त्यामुळेच बंगाली गद्याच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला जातो. त्यांच्या पूर्वी राजा राममोहन रॉय यांनी गद्यशैली रूढ केली होती; पण ती पंडिती वळणाची होती. सर्वसामान्यांना ती सहजगम्य नव्हती. त्यांची स्वतःची प्रकृती तत्त्वचिंतकाची असल्याने भाषाशिल्पाकडे त्यांनी कधी लक्षच दिले नाही. ईश्वरचंद्रांची प्रकृती त्यांच्याहून भिन्न होती. ती जशी पंडिताची तशीच साहित्यरसिकाची व सामाजिक संस्कारकाची होती. म्हणून आजही त्यांचे साहित्य वाचले जाते. त्यांचे लेखन मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषांत आहे. ईश्वरचंद्रांनी मुख्यतः शिक्षणाचा प्रसार, समाजसुधारणा आणि साहित्यनिर्मिती अशा त्रिविध भूमिकांतून लेखन केले. संस्कृत भाषेच्या सुलभ अध्ययनासाठी त्यांनी बोधोदय (१८५१), उपक्रमणिका (१८५१), ऋजुपाठ (३ भाग, १८५१-५२), व्याकरण कौमुदी (३ भाग, १८५३ व १८६२) व वर्णपरिचय (२ भाग, १८५५) हे ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे बंगाली भाषा शिकण्यासाठी कथामाला (१८५६) तसेच शब्द मंजरी नावाचा शब्दकोश तयार केला. बांगलार इतिहास (१८४८), जीवन चरित (१८४९), चरितावलि (१८५६)  आणि भूगोल-खगोल-वर्णन (१८९२) हे ग्रंथ त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोणाचे आणि चतुरस्र जिज्ञासेचे द्योतक आहेत. त्यांची पहिली साहित्यकृती वेताल पंचविंशति (१८४७) ही सुलभ बंगाली भाषेचे प्रतीक म्हणून आजही लोकप्रिय आहे. शकुंतला उपाख्यान (१८५४), सीतार वनबास (१८६०), आख्यान मंजरी (१८६३) आणि भ्रांतिविलास (१८६९) ह्या त्यांच्या इतर साहित्यकृती आहेत. पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी विधवाविवाह (१८५५) ग्रंथ लिहिला. विधवाविवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच दाखविणारा आणि पंडितांना त्यांनी प्रमाणभूत मानलेल्या ग्रंथांच्या आधारेच निरुत्तर करणारा ग्रंथ म्हणून तो अद्वितीय ठरला. याव्यतिरिक्त विद्यासागर यांनी संस्कृत नाटकांचे तसेच महाभारतादी इतर बारा ग्रंथांचे संपादन केले आहे.

      कलकत्त्यास भरलेल्या दरबारात त्यांना इंग्‍लंडच्या राणीकडून सन १८७७ साली बहुमानाची सनद मिळाली व पुढे सीआय्इ. ही पदवीही मिळाली. वैयक्तिक आचरणात विद्यासागर अत्यंत साधे परंतु निर्भय होते. समाजसुधारणेच्या बाबतीत विद्यासागर हे राजा राममोहन रॉय यांचे वारसच म्हणावे लागतील. त्यांच्या सामाजिक कार्यामागील निकोप बुद्धिवाद त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्यापासूनच उचलला होता. ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळविले; पण ते सारे त्यांनी दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित ह्यांच्या साह्यार्थ खर्चिले. त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती. ते अज्ञेयवादी होते. देव, धर्म, अध्यात्म इत्यादींच्या गुंत्यात त्यांनी स्वतःला कधीच अडकवून घेतले नाही. "मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो", असे ते म्हणत. हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीसपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला आणि त्यामुळे सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर म्हणूनच अधिक ओळखते. त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग दि.२९ जुलै १८९१ रोजी केला.

!! बंगालच्या दयासागरास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

कृगोनि: श्री कृ. गो. निकोडे गुरूजी.

                 रामनगर, वॉर्ड नं- 20, गडचिरोली.

                 मधुभाष- 7775041086.

                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या